बरे झालेल्या 260 मनोरुग्णांना कुटुंबीयांनी सोडले वाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 08:12 AM2024-07-27T08:12:40+5:302024-07-27T08:12:52+5:30
मानसिक आजार झालेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करणे गरीब कुटुंबीयांना परवडत नाही. शिवाय, शासन आणि महापालिकेच्या रुग्णालयांवर मोठा ताण असतो. अशावेळी १०० वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या ठाणे जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयाचा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना आधार वाटतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मानसिक आजार अधिक प्रमाणात बळावल्याने अनेक रुग्णांचे नातेवाईक त्यांना उपचारासाठी ठाणे येथील जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करत असतात. मात्र, आजारातून बाहेर पडल्यानंतर या रुग्णांचे नातलग त्यांना घेण्यासाठी येत नाहीत. गेल्या चार वर्षांत अशा रुग्णांची संख्या २६० झाली असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. मात्र, या रुग्णांचे सामाजिक संस्थांच्या मदतीने पुनर्वसन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
मानसिक आजार झालेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करणे गरीब कुटुंबीयांना परवडत नाही. शिवाय, शासन आणि महापालिकेच्या रुग्णालयांवर मोठा ताण असतो. अशावेळी १०० वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या ठाणे जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयाचा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना आधार वाटतो. त्यामुळे या रुग्णालयात राज्याच्या विविध भागांतून रुग्ण येतात.
माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये गेल्या चार वर्षात २६० रुग्ण बरे होऊनही त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी वाऱ्यावर सोडले आहे. त्यामध्ये २०२१ - ५०, २०२२- ६०, २०२३ - ८५, २०२४ - ६५ रुग्णांचा समावेश आहे. मानसिक उपचाराचा कालावधी मोठा असतो. नातेवाईक मनोरुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास येतात त्यावेळी चुकीचा पत्ता देतात, तर काहीजण पुढले काही दिवस रुग्णास भेटावयास येतात. कालांतराने या भेटी बंद होतात. मोबाइल नंबर बदलला जातो. उपचार करताना दिलेला पत्ता बदललेला असतो. अशावेळी रुग्णांना कुठे पाठवायचे हा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडतो.
वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बरे झालेल्या रुग्णांना घरी पाठवताना रुग्णालय प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काहीवेळा कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. त्यामुळे अनेकवेळा नातेवाईक त्या रुग्णाला परत घेण्यास नकार देतात. तसेच अनेक रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी जाण्याची इच्छा असते. मात्र, त्यांना नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतात. अशावेळी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठविण्याची व्यवस्था काही वर्षांपासून केली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून नवीन कायद्यानुसार मानसिक आजारातून बरे झालेल्या मात्र नातेवाईक न सापडलेल्या रुग्णांना पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत बरे झालेल्या २२० रुग्णांना तळोजा येथील जागृती पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात आले आहे. रुग्णालयात मानसिक आजारातून बरे झालेले, मात्र त्यासोबत अन्य सहव्याधी असलेल्या (ऐकू न येणारे किंवा अन्य प्रकारचे दिव्यांग) ६३ रुग्णांना विशेष पुनर्वसन केंद्रात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. रुग्णाच्या नातेवाइकांचा पत्ता सापडला तर त्यांना नातेवाइकांकडे सोपविण्यात येते.
- डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक, ठाणे जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालय