दाऊदसह फरार २७ आरोपी आता आले आहेत भारताच्या टप्प्यात, ९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 03:32 AM2017-10-26T03:32:46+5:302017-10-26T03:32:57+5:30
ठाणे : मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा खटला योग्य दिशेने झाला. नुकतीच या खटल्यातील सात आरोपींना शिक्षा झाली.
ठाणे : मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा खटला योग्य दिशेने झाला. नुकतीच या खटल्यातील सात आरोपींना शिक्षा झाली. खटल्यातील दाऊदसह फरार असलेल्या उर्वरित २७ आरोपींना आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून हे सर्व आरोपी भारताच्या टप्प्यात आहेत. ते पकडले गेले तर खटल्याचा वकील म्हणून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठीच प्रयत्न करणार असल्याचे मत मार्च ९३ च्या बॉम्बस्फोटांच्या खटल्याचे सीबीआयचे विशेष वकील दीपक साळवी यांनी व्यक्त केले.
विचार व्यासपीठातर्फे दीपक साळवी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम मराठी ग्रंथसंग्रहालय येथे नुकातच आयोजिण्यात आला होता. मकरंद मुळे आणि अभय मराठे यांनी मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले. मुंबई पोलीस, सीबीआय आणि सीआयडी या तपास यंत्रणांनी मार्च ९३ च्या बॉम्बस्फोटांचा खटला हा देशाचा खटला म्हणून पाहिला आणि त्यादृष्टीने मन-बुद्धी स्थिर ठेवून उपलब्ध माहितीचा, स्रोतांचा प्रभावी वापर करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. बॉम्बस्फोट मालिकेची गुंतागुंत उलगडून सांगितली. सात वर्षांपूर्वी जेव्हा हा खटला हातात घेतला, तेव्हा आरोपींना फासावर लटकवण्याइतके पुरावे नसल्याचे आढळून आल्यानंतर आपल्यामध्ये खूप निराशेचे वातावरण होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात जवळपास ६८६ साक्षीदारांची साक्ष पुन्हा घेण्याची परवानगी आपण मिळवली. त्यातील ४५० साक्षीदारांची साक्ष नव्याने नोंदवून घेत हा खटला कायद्याच्या दृष्टीने सक्षम केल्यामुळे आरोपींना शिक्षा होण्यास मदत झाली. खटल्याची जवळपास दीड लाख पाने वाचल्यानंतर यातून आरोपी सुटतील, असे वाटले होते. मात्र, नंतर खूप युक्तिवाद आणि संघर्ष केला, असे साळवी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. माझे वडील, काका, गुरू नानासाहेब लिमये व निवृत्त न्यायमूर्ती देशमुख यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे मी व्यावसायिक नैतिकता टिकवू शकलो. अन्यथा, या खटल्यादरम्यान अनेक वेळा मला प्रलोभने दाखवली गेली; परंतु ती प्रलोभने मी सहजपणे नाकारली, असेही साळवी यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान साळवी यांचा सत्कार निवृत्त न्यायाधीश सदाशिव देशमुख आणि उद्योजक रमेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला.
९३ च्या एका वर्तमानपत्रातील बातमी वाचून एक साक्षीदार नव्याने उभा राहिला होता.
त्या साक्षीदारामुळे एका आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली.
या साक्षीदाराने स्वत:ला संरक्षण घेण्यासही नकार दिला आणि प्रसंगी आपल्याला ठार मारले तरी मी साक्ष देईन, असे सांगितले होते, या आठवणीला साळवी यांनी उजाळा दिला.