ठाण्यातील जुगार अड्डयावरील धाडीत मालकासह २७ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 11:53 PM2020-10-23T23:53:02+5:302020-10-23T23:55:44+5:30
ओवळा येथील भैय्यापाडा तलावाच्या बाजूला असलेल्या एका जुगाराच्या अड्डयावर कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड टाकली. या धाडीत ९० हजार ७८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून जुगार अड्डयाच्या मालकासह २७ जणांना पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोडबंदर रोड भागात भैय्यापाडा तलावाच्या बाजूला असलेल्या महादेव पाटील यांच्या खोलीत चालणाऱ्या जुगार अड्डयावर कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड टाकली. या धाडीत ९० हजार ७८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याठिकाणी जुगार अड्डयाच्या मालकासह २७ जणांना पोलिसांनी अटक केली. या सर्वांची जामीनावर सुटका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घोडबंदर रोडवरील ओवळा येथील महादेव पाटील यांच्या खोलीतील पहिल्या मजल्यावर तीन पत्ता जुगार खेळला जात असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, निरीक्षक वैभव धुमाळ आणि सहायक पोलीस निरीक्षक एस. एच. चाबुकस्वार आदींच्या पथकाने २२ आॅक्टोबर रोजी रात्री ७ ते ११ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी धाड टाकली. त्यावेळी जुगाराचा मालक बबन सोमुखराव (४१, रा. कासारवडवली, ठाणे) रमाकांत केणी (६२, रा. ओवळा, ठाणे) आणि व्यवस्थापक शंभू साजेकर (४४, रा. सिद्धेश्वर तलाव, ठाणे) यांच्यासह २७ जणांना बेकायदेशीररित्या ‘तीन पत्ता’ नावाचा जुगार पैशांवर खेळत असतांना त्यांना ताब्यात घेण्यात आले. कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या काळात संसर्गाची भीती असतांना हयगयीचे कृत्य, जुगार प्रतिबंधक कायदा तसेच पोलीस आयुक्तांचा मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांची जामीनावर सुटका झाल्याचे पोलिसांनी सांगितले.