भिवंडीतील २७ नगरसेवक गुन्हेगार

By admin | Published: May 30, 2017 05:55 AM2017-05-30T05:55:06+5:302017-05-30T05:55:06+5:30

भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या ९० उमेदवारांपैकी २७ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले

27 corporators of Bhiwandi criminal | भिवंडीतील २७ नगरसेवक गुन्हेगार

भिवंडीतील २७ नगरसेवक गुन्हेगार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या ९० उमेदवारांपैकी २७ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. त्यामधील २१ उमेदवारांवर गंभीर स्वरूपातील गुन्हे दाखल आहेत. तर, अपक्ष आणि अन्य पक्षांतून निवडून आलेल्या फक्त ४ उमेदवारांवर एकही गुन्हा दाखल नसल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. तसेच ४४ उमेदवार करोडपती असून यात शिवसेना-भाजपा आणि कोणार्क आघाडीच्या उमेदवारांचा समावेश आहे. करोडपती उमेदवारांचे प्रमाण ५० टक्के आहे.
२७ पैकी २१ जणांवर गंभीर गुन्हे
भिवंडी महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी पार पडली. या निवडणुकीत ४६० जणांनी नशीब आजमावले होते. याचदरम्यान, नवी दिल्ली येथील असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थेने ४५८ उमेदवारांपैकी ४५१ उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला. त्यांच्या निष्क र्षानुसार ८२ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यापैकी ६१ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यापैकी २७ उमेदवार महापालिकेवर निवडून आल्याची माहिती त्याच संस्थेने दिली आहे.
निवडून गेलेल्या २७ (३१ टक्के) उमेदवारांपैकी २१ (२४ टक्के) उमेदवारांवर बलात्कार, अपहरण किंवा खुनासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे.
निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये पक्षनिहाय विचार केल्यास काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेले ४७ पैकी १६ उमेदवार गुन्हेगार पार्श्वभूमीचे असून त्यापैकी १० जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्याखालोखाल भारतीय जनता पार्टीचे १९ पैकी ५ जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर, शिवसेनेचे १२ पैकी ४ जण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. कोणार्क विकास आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (एकतावादी) यांच्या प्रत्येकी ३ उमेदवारांपैकी प्रत्येकी एक जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, अपक्ष म्हणून निवडून आलेले उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नसल्याचे म्हटले आहे.
बाळाराम चौधरी श्रीमंत
भिवंडी महापालिकेवर निवडून गेलेले ४४ उमेदवार करोडपती आहेत. करोडपतीच्या टॉप टेनमध्ये शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी ४, तर कोणार्क विकास आघाडीच्या दोघांचा समावेश आहे. मात्र, करोडपतींमध्ये सर्वाधिक काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या १४ उमेदवारांचा समावेश आहे. तर, तीन लाखांच्या आत मालमत्ता असलेले ६ उमेदवार असून ते सर्व काँग्रेसचे आहेत. प्रभाग क्रमांक १३ ड मधून निवडून आलेले शिवसेनेचे बाळाराम चौधरी हे सर्वाधिक श्रीमंत आहेत. त्यांच्या नावावर एकूण ५० कोटी १० लाखांहून अधिक मालमत्ता आहे.


50लाखांहून अधिक प्राप्तीकर भरणाऱ्यांमध्ये चार जण आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे बाळाराम चौधरी हे सर्वाधिक कोटींहून अधिक भरण्यामध्ये एक नंबरवर आहेत. त्यापाठोपाठ वैशाली मनोज म्हात्रे, विलास पाटील, त्यांची पत्नी प्रतिभा पाटील असे अनुक्रमाने आहेत.

निवडून आलेल्यांत तीनच तरुण
२१ ते २४ वयोगटांतून ३ उमेदवार निवडून आले आहेत. तर, ७१-८० वयोगट असलेलेही तिघे आहेत. ४१-५० वयोगट असलेले सर्वाधिक ३७ उमेदवार असून त्याखालोखाल ३१-४० वयोगटांतील २०, २५ ते ३० वयोगटांमधील ९, ५१-६० आणि ६१-७० वयोगट असलेले प्रत्येकी ८ जण निवडून आले आहेत.

Web Title: 27 corporators of Bhiwandi criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.