27 गाव संघर्ष समितीचा कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:03 PM2018-03-31T12:03:04+5:302018-03-31T12:04:46+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेत येऊनही कोणत्या सोयी सुविधा मिळत नसल्याचे सांगत 27 गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना घेराव घातला. तसेच ग्रामस्थांना अव्वाच्या सव्वा मालमत्ता कर पाठवल्याबद्दल संघर्ष समितीने मालमत्ता कराची होळीदेखील केली.
डोंबिवली- कल्याण डोंबिवली महापालिकेत येऊनही कोणत्या सोयी सुविधा मिळत नसल्याचे सांगत 27 गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना शनिवारी घेराव घातला. तसेच ग्रामस्थांना अव्वाच्या सव्वा मालमत्ता कर पाठवल्याबद्दल संघर्ष समितीने मालमत्ता कराची होळीदेखील केली. वेगळी नगरपालिका हवी यासाठी 27 गाव संघर्ष समितीचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. महापालिकेत नुकतेच आलेले नविन आयुक्त गोविंद बोडके यांचा शनिवारी सकाळी 27 गावांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या पाहणी दौऱ्यानंतर वेळी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेत पालिका आयुक्तांचा ताफा रोखला. आणि नंतर काटई पोलीस चौकीमध्ये पालिका आयुक्तांना घेराव घातला. यावेळी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांवर आरोग्य यंत्रणा, शाळा, पायाभूत सुविधा, वाढवून आलेली मालमत्ता कराची बिलं आदीं प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर संघर्ष समितीचे जे काही म्हणणे असेल ते आपण नक्कीच शासनाला कळवू असे उत्तर पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. आयुक्तांशी बोलणी झाल्यावर संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी बाहेर येत महापालिकेने पाठवलेल्या मालमत्ता कराच्या बिलाची होळी करून आपला रोष वाक्य केला. तसेच 27 गावांची वेगळी नगरपालिका करा, तोपर्यंत कोणीही मालमत्ता कर भरणार नाही या घोषणेचा पुनरुच्चारही केला. तसेच समितीची भूमिका समजून घेण्यासाठी आयुक्त बोडके यांनी समितीला सोमवारी दुपारी 3 वाजता कल्याण मुख्यालय येथे बैठकीला बोलावले आहे, अशी माहिती समितीचे गुलाब वझे यांनी दिली. यावेळी झालेल्या आंदोलनामध्ये गुलाब वझे, अर्जुनबुवा चौधरी, वंडार पाटील, चंद्रकांत पाटील, दशरथ पाटील, विजय भाने, गजानन मंगरुळकर, भगवान पाटील, दत्ता वझे, वासुदेव गायकर, कृष्णाबुवा मढवी, सुधीर पाटील, गजानन पाटील, यांच्यासह 27 गाव संघर्ष समितीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.