२७ गावे संघर्ष समिती राष्ट्रवादीच्या वळचणीला
By admin | Published: July 25, 2016 02:58 AM2016-07-25T02:58:18+5:302016-07-25T02:58:18+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीवेळी भाजपासोबत गेलेल्या २७ गावे संघर्ष समितीने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला आहे.
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीवेळी भाजपासोबत गेलेल्या २७ गावे संघर्ष समितीने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला आहे. भाजपा आणि मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपुरता आमचा वापर केला आणि फसवणूक केल्याची टीका त्यांच्या नेत्यांनी केली.
ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून गावांत फूट पाडण्याच्या केलेल्या प्रयत्नांबद्दल संताप व्यक्त करून त्याला विरोध करण्याचा पुनरुच्चारही या गावांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केला.
२७ गावे समिती सर्वपक्षीय असली तरी ती राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या हाती असल्याने शिवसेनेने समितीच्या महापालिकेतून वेगळे होण्याच्या मागणीला विरोध केला. तसेच निवडणुकीवरील या गावांचा बहिष्कार मोडीत काढून शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाने संघर्ष समितीची जाहीर सभा घेतली. त्यात ही २७ गावे वेगळी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र, निवडणुका झाल्यावरही ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केल्याची संघर्ष समितीची भावना झाली. त्यातच, या २७ गावांतील १० गावांमध्ये कल्याण ग्रोेंथ सेंटर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्याला समितीने विरोध केला.
भाजपाने संघर्ष समितीचा राजकीय वापर करून घेतला. समितीची फसवणूक मुख्यमंत्र्यांनी केल्याने आता ही समिती राष्ट्रवादीचीच आहे. राष्ट्रवादीतर्फेच आम्ही लढा देणार, असे समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे व अर्जुन चौधरी यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जाहीर केले. मेळाव्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी समितीला कानपिचक्या दिल्या होत्या.