२७ गावांत पालकमंत्र्यांची परीक्षा तर समितीची कसोटी
By admin | Published: October 30, 2015 11:52 PM2015-10-30T23:52:36+5:302015-10-30T23:52:36+5:30
कल्याण-डोंबिवली मनपाच्या पाचव्या सार्वजनिक निवडणुकीत २७ गावांचा विषय निवडणुकीचा केंद्रबिंदू राहिला अन् गाजला. येथे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनपा, आरपीआय
अरविंद म्हात्रे, चिकणघर
कल्याण-डोंबिवली मनपाच्या पाचव्या सार्वजनिक निवडणुकीत २७ गावांचा विषय निवडणुकीचा केंद्रबिंदू राहिला अन् गाजला. येथे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनपा, आरपीआय, सपा, बसपा अशा सर्वपक्षीयांचे नेतृत्व करणारी संघर्ष समिती आणि शिवसेना यांच्यात फेस टू फेस सामना रंगला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३२ वर्षांचा बहिष्कार फोडल्याचा राग धरून संघर्ष समिती चवताळल्यागत शिवसेनेला शह देण्यासाठी शड्डू ठोकून रिंगणात उतरल्याने ही निवडणूक खूपच चुरशीची झाली आहे. यामुळे पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. तर, संघर्ष समितीचीही कसोटी लागलेली आहे.
मुख्यमंत्र्यांसह मंत्री,आमदार, खासदार यांनी २७ गावांत हजेरी लावून समितीच्या पाठीशी सरकार असल्याची ग्वाही दिली. यामुळे २७ गावे समिती बळकट झाली असली तरी खुद्द पालकमंत्री रात्री २७ गावांत घरोघरी प्रचारास फिरल्याने शिवसेनेतही उत्साह बघायला मिळाला. त्यांनी नियोजनबद्ध प्रचार केला. तर, संघर्ष समितीने प्रचारात त्यांनाच टार्गेट करून भूमिपुत्रांच्या हिताआड आल्याचा आरोप केला. यामुळे २७ गावांचा प्रचारही आज (३० आॅक्टो.) संपला असून समितीने घरोघरी जाऊन मतदारांना शिवसेनेने २७ गावांना वेठीस धरल्याचा प्रचार केला. संघर्ष समितीला राजकीय लाभ देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. समितीच्या प्रचारामुळे पालकमंत्र्यांना २७ गावांत घरोघरी मते मागण्यासाठी जावे लागले. येथे शिवसेनेची एक उमेदवार आधी बिनविरोध आलेली आहे. गेल्या ३२ वर्षांपासून २७ गावांत नियोजनबद्ध विकास नाही. यामुळे समस्याग्रस्त ठरलेल्या या गावांसाठीही ही निवडणूक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. १ तारखेला होणाऱ्या मतदानानंतर जनता कोणाच्या बाजूने कौल देते, यावर त्यांचे भवितव्य अधिक अवलंबून आहे.