लाभार्थ्यांना आता २७ हजारांचा अतिरिक्त लाभ!
By admin | Published: October 12, 2015 05:18 AM2015-10-12T05:18:38+5:302015-10-12T05:18:38+5:30
राज्यातील बेघर कुटुंबांना इंदिरा आवास योजनेच्या घरकुलांचा लाभ मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यासाठीच्या बांधकामासाठी मिळणाऱ्या ९५ हजार रुपयांच्या खर्चात आता २७ हजारांची नव्याने वाढ होऊन
सुरेश लोखंडे , ठाणे
राज्यातील बेघर कुटुंबांना इंदिरा आवास योजनेच्या घरकुलांचा लाभ मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यासाठीच्या बांधकामासाठी मिळणाऱ्या ९५ हजार रुपयांच्या खर्चात आता २७ हजारांची नव्याने वाढ होऊन लाभार्थ्याच्या बँक खात्यावर एक लाख २२ हजार जमा होणार आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार नवीन लाभार्थ्यांना या वाढीव रकमेचा लाभ होणार आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे गावखेड्यांतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना या इंदिरा आवास
योजनेच्या घरकुलांचा लाभ मिळत आहे. या योजनेद्वारे लाभार्थ्यांना २०१३-१४ या आर्थिक वर्षापर्यंत ९५ हजार रुपये मिळत होते, पण त्यात नव्याने २७ हजारांची अतिरिक्त वाढ केल्याचे नवीन परिपत्रक राज्य शासनाने २०१४-१५ या वर्षापासून लागू केले आहे.
या कालावधीतील मंजूर घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्यांना एक लाख २२ हजार मिळणार असल्याच्या वृत्तास जिल्हा प्रकल्प अधिकारी आर.के. बामणे यांनी दुजोरा दिला आहे. घरकुल बांधण्यासाठी मिळणाऱ्या ९५ हजार रुपयांच्या तरतुदीमध्ये निर्मल भारत अभियानाद्वारे १२ हजार रुपये मिळणार आहेत. त्यातून लाभार्थ्याने घरात किंवा बाहेर वैयक्तिक शौचालय बांधायचे आहे. याशिवाय, घरकुल बांधण्यासाठी राबणाऱ्या लाभार्थ्याला मनरेगाद्वारे सुमारे १५ हजार मिळणार आहेत. इंदिरा आवास, निर्मल भारत आणि मनरेगा या तिन्ही योजना मिळून एक लाख २२ हजार रुपये लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
राज्यात अतिरिक्त लाभासाठी राज्य शासनाने एक वर्ष आधीच (२०१३-१४) परिपत्रक जारी केले होते, पण त्यात असंख्य त्रुटी असल्यामुळे त्याचा लाभ मिळाला नव्हता. त्यात दुरुस्ती करून नव्याने काढलेल्या या परिपत्रकानुसार अतिरिक्त रकमेच्या लाभाचा मार्ग मोकळा झाला आहे. या रकमेचा अपहार होऊ नये, यासाठी लाभार्थ्याच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.