पतीला २७ हजार पगार, गृहिणीच्या बँक खात्यात २० कोटींची उलाढाल; ‘प्राप्तिकर’ची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 06:01 AM2023-04-10T06:01:21+5:302023-04-10T06:01:39+5:30
पॅन कार्डचा गैरवापर करून बनावट खाती उघडून फसवणूक झाल्याची तक्रार भाईंदर पाेलिसांसह प्राप्तिकर विभाग, रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.
मीरा रोड :
पतीला २७ हजार रुपये पगार, गृहकर्जाचे हप्ते भरणाऱ्या गृहिणीला प्राप्तिकर विभागाने दाेन बँक खात्यांतून २० काेटींपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल केल्याबाबत नाेटीस पाठविली आहे. या प्रकरणी तिने पॅन कार्डचा गैरवापर करून बनावट खाती उघडून फसवणूक झाल्याची तक्रार भाईंदर पाेलिसांसह प्राप्तिकर विभाग, रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.
भाईंदर पश्चिमेस क्रॉस गार्डनजवळील फेरो कॉम्प्लेक्समध्ये आशा जैन या पती देविचंद व दाेन मुलांसह राहतात. त्यांना २९ मार्चला प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठविली आहे. त्यात सिद्धी इंटरप्रायझेस भाईंदरच्या आयसीआयसीआय बँक शाखेतून सहा कोटी ३७ लाख ९१ हजार, तर मीरा रोडच्या डीसीबी बँक शाखेतून १४ कोटी तीन लाख ९६ हजारांचे व्यवहार २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात झाल्याबद्दल स्पष्टीकरण सादर करण्याची नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे, जैन यांच्या नावे त्या वर्षाचा एक लाख ५४ हजार इतका प्राप्तिकरही भरण्यात आला आहे. या प्रकाराने त्यांना मानसिक धक्का बसला आहे.
आर्थिक स्थिती बेताची असल्याने, दोन मुलांच्या शिक्षणासाठी आणि घरात किराणा खरेदीसाठी काही संस्थांच्या मदतीवर आपण अवलंबून आहाेत. खाद्यपदार्थ बनवून विक्रीचा व्यवसाय असून, गाैतम भन्साळी नामक परिचित व्यक्तीने भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याची गळ घातली. पॅन कार्ड घेऊन सिद्धी इंटरप्रायझेस नावाने बँक खाते उघडले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ते खाते पत्र देऊन बंद केले हाेते. प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्यानंतर, आयसीआयसीआय व डीसीबी बँकेत सिद्धी इंटरप्रायझेस नावाने बनावट खाती उघडून काेट्यवधींचे व्यवहार केल्याचे आढळले आहे.
धमकावले जात असल्याचा आराेप
गौतम याला जाब विचारला असता, आता तो धमकावत आहे.
या प्रकरणी गौतमसह अन्य काही लोकांची नावे देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाईंदर पोलिसांकडे लेखी तक्रारीद्वारे केल्याचे जैन यांनी सांगितले.
काळा पैसा हा पांढरा करण्यासह सरकारचा कर बुडविण्यासाठी संगनमताने हा घोटाळा केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
बँकेत खाते उघडताना, मोबाइल क्रमांक, घरचा पत्ता गौतम याचाच असल्याचे आढळले. व्यवहारांची माहिती मिळू शकली नसल्याचे जैन यांचे म्हणणे आहे.