२७ गावे भाजपाविरोधात ?
By admin | Published: March 25, 2016 12:51 AM2016-03-25T00:51:46+5:302016-03-25T00:51:46+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाशी युती करणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने १७ एप्रिलला प्रभाग क्रमांक ११४ आणि ११९ मध्ये होणाऱ्या
- अरविंद म्हात्रे, चिकणघर
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाशी युती करणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने १७ एप्रिलला प्रभाग क्रमांक ११४ आणि ११९ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे संघर्ष समिती भाजपालाही पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनसेने आधीच या पोटनिवडणुकीतून अंग काढून घेत बहिष्काराच्या बाजूने संकेत दिले आहेत. आता शिवसेना आणि भाजपा यांनी या निवडणुकीवर बहिष्कार न घातल्यास त्यांच्यात थेट लढत होणार असल्याचे चित्र आहे. मात्र, भाजपाने संघर्ष समितीची बाजू राखत बहिष्कारात सहभाग घेतला तर मात्र दोन्ही प्रभाग शिवसेनेला मिळण्याची स्थिती आहे. परंतु, दोन्ही प्रभाग मिळाले तरी शिवसेनेला फरक पडणार नसल्याचे २७ गावांतील शिवसेना नेते प्रकाश म्हात्रे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनाही तळ्यातमळ्यात आहे.
२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे ूमुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले न गेल्याने समितीच्या नेत्यांचीच कोंडी झाली आहे. परिणामी, त्यांनी पोटनिवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. संघर्ष समिती भाजपा किंवा आणखी कोणालाही पाठिंबा देणार नाही, असे समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
एकेक जागा वाटून घेणार
संघर्ष समिती बहिष्कारावर ठाम राहिली तर शिवसेना-भाजपा एकेक जागा वाटून घेणार आहे, अशी चर्चाही २७ गावांत ऐकायला मिळत आहे.