नगरपालिकेसाठी २७ गावे आक्रमक
By admin | Published: February 2, 2016 01:56 AM2016-02-02T01:56:21+5:302016-02-02T01:56:21+5:30
आमच्या मनाविरुद्ध आमचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश झाला आहे. पालिकेतून बाहेर पडण्याचा आमचा निर्धार पक्का आहे
कल्याण : आमच्या मनाविरुद्ध आमचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश झाला आहे. पालिकेतून बाहेर पडण्याचा आमचा निर्धार पक्का आहे. काहीही झाले तरी आम्ही २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका मिळवू, असा निर्वाणीचा इशारा संघर्ष समितीच्या नेत्यांनी सोमवारच्या सभेत पुन्हा एकदा दिला आणि शिवसेनेवर टीका करत मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेत सभेची सांगता झाली.
संघर्ष समिती निवडणुकीच्या काळात भाजपासोबत होती. मात्र, आता भाजपाच्याच नगरसेवकांचा गावे वगळण्यास विरोध असल्याच्या पार्श्वभूमीवर २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची सभा मानपाडेश्वर मंदिरात बोलवण्यात आली होती. तिला समितीच्या नेत्यांसह भाजपाचे आमदार नरेंद्र पवार, भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. संघर्ष समितीतील एकजूट कायम असून त्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा इशारा या वेळी नेत्यांनी दिला. मात्र, तो फक्त शिवसेनेसाठी होता की अन्य कुणासाठी, याची चर्चा सभेनंतर रंगली.
ही गावे पालिकेतून पुन्हा वगळली गेली. मात्र, निवडणूक आयोगाच्या आडोशाने मित्रपक्षाच्या विघ्नसंतोषी नेत्यांनी २७ गावांवर निवडणूक लादली. या गावांतील सर्व २२ जागा जिंकण्याची स्वप्ने बघणाऱ्यांना केवळ पाचच जागांवर समाधान मानावे लागले. सर्व जागा आमच्याच
आहेत. संघर्ष समितीला २७ गावांत स्थान नसल्याचा प्रचार त्यांनी केला. मात्र, त्यांना या गावांत किती स्थान आहे, हे सिद्ध झाल्याचा टोला गुलाब वझे यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला.
१९९५ पासून १५ वर्षांत या गावांतून केडीएमसीने कररूपाने ३५० कोटींची वसुली केली. पण, अवघे २२ कोटी खर्च केल्याचा आरोप करून उपाध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी आमचे ३२८ कोटी पालिका प्रशासनाने हडपल्याचा दावा केला. या महापालिकेत आमचा समावेश नकोच, या भूमिकेचा पुनरुच्चार त्यांनी केला.
येथील मातीशी गद्दारी करणाऱ्यांना गावकऱ्यांनी मतदानातून झुगारल्याची आणि त्यांची ताकद संपल्याची खोचक टीका उपाध्यक्ष अर्जुनबुवा चौधरी यांनी केली. पालिकेतून २७ गावे वगळण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पाळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ही गावे वगळण्याबाबत लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांनी दिले. (वार्ताहर)