‘२७ गावांची नगरपालिका ही काळ्या दगडावरची रेघ’
By admin | Published: October 27, 2015 12:16 AM2015-10-27T00:16:39+5:302015-10-27T00:16:39+5:30
२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा पुनरुच्चार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोनारपाड्याच्या जाहीर सभेत केला
चिकणघर : २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा पुनरुच्चार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोनारपाड्याच्या जाहीर सभेत केला. रविवारी ते प्रचार सभेसाठी येथे आले होते. त्यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळून घणाघाती टीका केली. केडीएमसीत बकालावस्था आणणाऱ्या आधीच्या सत्ताधाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले.
राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये कल्याण-डोंबिवली मनपाची अवस्था बेकार करणारे २७ गावांचा विकास कसा करणार? ही २७ गावकऱ्यांची भीती बरोबर आहे. सारा देश या मनपाकडे ऐतिहासिक शहराची मनपा म्हणून बघतो. पण, ही मनपा आहे की नरकपुरी, असा सवाल करून २७ गावांतील जनभावनेचा आदर करायचा सोडून शिवसेनेने या भागांवर सत्तेच्या लालसेपोटीच निवडणुका लादल्या. या मनपाला कचरा साठवण्यास जागा नाही, न्यायालय ताशेरे ओढते, हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे आणि आणखी २७ गावांचा विकास करू म्हणणारे गावकऱ्यांच्या भावनांशी खेळतात, हे बरे नव्हे. (वार्ताहर)