२७ गावे, दिव्याला जादा पाणी
By admin | Published: May 3, 2017 05:24 AM2017-05-03T05:24:01+5:302017-05-03T05:24:01+5:30
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केडीएमसीच्या हद्दीतील २७ गावांना २५ तर ठाणे महापालिका हद्दीतील दिव्याला १० एमएलडी
कल्याण : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केडीएमसीच्या हद्दीतील २७ गावांना २५ तर ठाणे महापालिका हद्दीतील दिव्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे निर्देश मंगळवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत हे निर्देश देण्यात आले.
२७ गावे आणि दिवा येथे भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईमुळे तेथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. त्यातून गेले वर्षभर नागरिकांनी वेगवेगळ््या माध्यमातून आपल्या नाराजीला तोंड फोडले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच दोन्ही महापालिकांमधील पदाधिकाऱ्यांनी येथील पाण्याचा कोटा वाढवण्याची मागणी जलसंपदामंत्री महाजन, पालकमंत्री शिंदे आणि एमआयडीसी यांच्याकडे केली होती. याची दखल घेत हा कोटा वाढवून देण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात एका विशेष बैठक झाली.
या प्रसंगी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. शिंदे, आमदार सुभाष भोईर, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अन्सारी आदी अधिकारी उपस्थित होते.
पाणीटंचाईमुळे दिवा परिसरातील नागरिक मुंब्रा येथून रेल्वेने पाणी आणत असल्याकडे, त्यातून दुर्घटना घडून काही जणांना जीव गमवावा लागल्याकडे डॉ. शिंदे यांनी या वेळी महाजन यांचे लक्ष वेधले. यंदाचा उपलब्ध पाणीसाठा समाधानकारक असल्यामुळे २७ गावे तसेच दिव्यासाठी पाण्याचा कोटा वाढवून देण्याची आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. त्यानुसार २७ गावांसाठी २५ आणि दिव्यासाठी १० एमएलडी पाणी वाढवून देण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. महाजन यांनी दिलेल्या निर्देशाबाबत त्यांचे उपस्थितांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
निर्देशच देतात, पण ठोस कृती कधी?
केडीएमसीतील २७ गावांना एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मागील उन्हाळ््यात पाणीकपातीमुळे १७ ते १८ दशलक्ष लिटर पाणी ग्रामीण भागाला मिळत होते. यंदा चांगला पाऊस होऊनही २७ गावांमध्ये पाणीटंचाई आहे.
ग्रामीण भागातील भाजपाच्या नगरसेवकांनी काही महिन्यांपूर्वीजलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन अतिरिक्त ३० दशलक्ष लिटर पाणी देण्याची मागणी केली होती. यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेअंती प्रतिदिन वाढीव १७ दशलक्ष लिटर पाणी देऊ, या निर्णयावार शिक्कामोर्तब करण्यात आले होते. परंतु, आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने मार्चमध्ये २७ गावांतील नागरिकांनी महापालिका मुख्यालयावर भव्य हंडाकळशी मोर्चा काढला होता. सरकारकडून अतिरिक्त पाण्याचा कोटा मंजूर झाला, याची अंमलबजावणी एप्रिल अखेरपर्यंत होण्याची शक्यता होती. परंतु, तीही झाली नाही. आता पुन्हा जलसंपदा मंत्र्यांनी अतिरिक्त पाणीसाठा देण्याचे निर्देश दिले आहेत. आजवर केवळ निर्देशच देण्यात आले आहेत, पण ठोस कृती होत नाही, असा सूर गावांमध्ये उमटत आहे.