27 गावांतील पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटणार, जागा तातडीने हस्तांतरित करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 06:32 PM2017-10-05T18:32:24+5:302017-10-05T18:32:34+5:30
सुभाष भोईर यांनी सुचवलेल्या सागाव, गावठाणच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत जलकुंभासाठी जागा उपलब्ध होण्याकरिता गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंजुरी दिली.
डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावात भीषण पाणी टंचाई असून ती सोडविण्यासाठी आमदार सुभाष भोईर यांनी सुचवलेल्या सागाव, गावठाणच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत जलकुंभासाठी जागा उपलब्ध होण्याकरिता गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंजुरी दिली. अधिका-यांना जागेचा ताबा महापालिकेकडे तातडीने हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.
सागाव येथील एमआयडीसीच्या उपलब्ध असलेल्या जागेमध्ये जलकुंभ बांधल्यास येथील बारा ते पंधरा गावांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकेल मात्र जागेअभावी व जलकुंभ नसल्याने सध्या २७ गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासाठी भोईर यांनी घेऊन जलकुंभ बांधण्याकरीता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यावर मंत्रालयात झालेल्या बैठकीत सागाव येथील ३५०० स्क्वेअर मी. जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे भोईर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.
तसेच अमृत योजनेतून महापालिकेने तातडीने जलकुंभ बांधून संप व पंप बांधणी करावी अशा सूचनाही उद्योगमंत्र्यानी केल्या आहेत. यामुळे २७ गावातील सागाव, सागर्ली, नांदिवली, स्टार कॉलनी, पी अँड टी कॉलनी, संघवी गार्डन, संजय नगर, चेरा नगर, मानपाडा, माणगाव, सोनार पाडा, आजदे, भोपर, देसले पाडा, नवनीत नगर या विभागाला पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकेल. या बैठकीला उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, एमआयडीसी अधीक्षक अभियंता सुभाष तुपे, उपअभियंता मनोज कुलकर्णी, कल्याण डोंबिवली मनपा कार्यकारी अभियंता राजीव पाठक, योगेश म्हात्रे उपस्थित होते.