मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल; आवक वाढल्याने भाव गडगडले, तरी उठाव नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 02:36 AM2018-11-24T02:36:02+5:302018-11-24T02:36:32+5:30
मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाव गडगडले तरीही ग्राहकच नसल्याने मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल झाल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. हा भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकºयांमधून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे : मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाव गडगडले तरीही ग्राहकच नसल्याने मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल झाल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. हा भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकºयांमधून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राज्यावर अवकाळी पावसाचे सावट असल्याने शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजार समित्यांमध्ये पाठवला जात आहे. त्यामुळे आवक वाढली तरी भाजी घेण्यासाठी तेवढ्या प्रमाणात ग्राहक नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याची माहिती घाऊक व्यापाºयांनी दिली.
वाशी मार्केटमध्ये शुक्रवारी २६० ट्रक तर कल्याण बाजार समितीमध्ये १७ ट्रक भाजीपाला विकला न गेल्याने पडून राहिला. यामध्ये नाशिक, जळगावसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील नऊ ट्रक भाजीपाला आहे. तर, अन्य राज्यांतून आठ ट्रक भाजी कल्याण मार्केटला आली. विशेष म्हणजे, गुरुवारी वाशी मार्केटमध्ये सुमारे ७०० ट्रक मालाची आवक होऊन कित्येक ट्रक भाजी पडून होती.
मुंबई बाजार समितीमध्ये शुक्रवारी ६६० ट्रक व टेंपोमधून २१९९ टन भाजीपाला व ७ लाख जुडी पालेभाज्यांची आवक झाली आहे. कोबी, टोमॅटो, भोपळा, गाजर, भेंडी, सिमला मिरची, फ्लॉवर, पालेभाज्यांची आवक मोठ्याप्रमाणात झाली आहे.
उठाव नसल्याने कोबी,फ्लॉवर व
वांगी खराब होण्याचे प्रमाणही वाढले
असून मार्केटमध्ये अशा खराब मालाचे ढिग पडून आहेत.
ग्राहकांना महागाईचे चटके
जादा आलेली भाजी बाजार समित्यांमध्ये सडत असताना दुसरीकडे किरकोळ विक्रेत्यांकडील भाव जैसे थेच असल्याने ग्राहकांना मात्र नेहमीप्रमाणेच दाम मोजावे लागत आहे.