भूमिगत विद्युतवाहिन्यांसाठी तब्बल २७९ कोटींचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:02 AM2020-09-29T00:02:25+5:302020-09-29T00:02:50+5:30
पालघरमधील ४३ गावांचा होणार समावेश : मंत्रालयातून खर्चाच्या मंजुरीची प्रतीक्षा
हितेन नाईक
पालघर : जिल्ह्यातील झाई ते एडवन दरम्यानच्या ४३ गावांत चक्रीवादळ योजनेअंतर्गत भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्यासंदर्भातील २७९ कोटींचा प्रस्ताव मंत्रालय पातळीवर पोचला आहे. यामुळे किनारपट्टीवर सतत येणाऱ्या चक्रीवादळांमुळे जुनाट खांब, तारा पडून होणारी जीवित व वित्तहानीच्या घटनांना आता पूर्णविराम मिळणार आहे.
पालघर जिल्ह्यासह कोकणातील अनेक जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाच्या तडाख्याने मोठमोठी झाडे उन्मळून पडत विद्युत खांब आणि तारा पडून मनुष्य आणि जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडतात. अलीकडेच अरबी समुद्रात ३ जून रोजी चक्रीवादळ रौद्ररूप धारण करीत पालघर किनाºयावर धडकणार असल्याचा हवामान खात्याचा इशारा होता, मात्र पालघर जिल्ह्याला चकवा देत हे वादळ पेणमार्गे अलिबागला धडकले होते. १०० कि.मी. प्रति तास वेगाने हे चक्रीवादळ धडकल्याने अनेक गाव-पाडे, घरे, बागायती क्षेत्र उद्ध्वस्त झाले होते. यात किनारपट्टीवरील शेकडो विद्युत खांब आणि वीजवाहक तारा पडून एका ५८ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूसह काही जनावरे मृत्युमुखी
पडली होती.
जिल्ह्यातील पालघर विभागा-अंतर्गत पालघर, सफाळे, बोईसर आणि डहाणू या उपविभागांसह ११२ कि.मी. अंतरावरील किनारपट्टी भागातील सर्व गावांत भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्याच्या कामाच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळणार आहे. बोईसर उपविभागाअंतर्गत मुरबे, नांदगाव, आलेवाडी, नवापूर, दांडी, उनभाट (चिरेभाट), उच्छेळी, घिवली, कंबोडा, चिंचणी, वरोर, वाढवण, धूमकेत, अब्राहम, गुंगवाडा, धाकटी डहाणू अशी १७ गावे, सफाळे उपविभागअंतर्गत केळवे, दातीवरे, खर्डी, कोरे, डोंगरे, एडवण, मथाने, भादवे, उसरणी, दांडा-खटाळी, आगरवाडी अशी १० गावे, पालघर उपविभागांतर्गत माहीम, वडराई आणि शिरगाव अशी तीन गावे तर डहाणू उपविभागअंतर्गत बोर्डी, झाई, बोरीगाव, घोलवड, आगार, मच्छीवाडा, चिखले, नरपड, आंबे मोरा, खडीपाडा, वडक्ती पाडा, डहाणू गाव अशा १३ गावांसह जिल्ह्यातील एकूण ४३ गावांमध्ये भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव पालघर विभागाच्या अधीक्षक अभियंत्या किरण नागावकर यांच्याकडून कल्याणचे मुख्य अभियंता यांच्याकडे जाऊन तो पुढे मंत्रालयात मंजुरीसाठी गेला आहे. मंत्रालयातून या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या ११२ किमी अंतरावरील किनारपट्टी गावातील सर्व खांब आणि तारांचे जाळे हटविले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळाच्या कोकणाला बसलेल्या तडाख्यानंतर झालेल्या वाताहतीची पाहणी केल्याने ते कोकणातील किनारपट्टीवरील सर्व गावांत भूमिगत विद्युत वाहिन्यांचे जाळे निर्माण करण्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे लवकरच या प्रस्तावाला मान्यता मिळेल, अशी अपेक्षा असून त्यामुळे पोल गंजले, तारा पडल्या, त्यामुळे विद्युत प्रवाह खंडित झाला, विद्युत वाहक तारांच्या संपर्कात येऊन जीवितहानी झाली आदी कारणांनी विद्युत वितरण विभागाविरोधात होणारी ओरड आता थांबणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने सडके खांब, लोंबकळत्या तारांचे जाळे असे ओंगळवाणे चित्र दूर होणार असून भूमिगत वाहिन्यांचे जाळे अगदी किनारी भागात नेले जाणार आहे. दुसरीकडे, वीजचोरी थांबणार असून विद्युत वितरण विभागाचा तोटाही थांबणार आहे.
महाराष्ट्र पहिले राज्य
प्रत्येक वर्षी कोकणातील किनारपट्टी भागात चक्रीवादळाच्या तडाख्याने महाराष्ट्र विद्युत वितरण विभागाचे खांब आणि तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने भविष्यातील अशा आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासनाने जागतिक बँकेच्या साहाय्याने राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प (एनसीआरएमपी) राबवण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना २०३.७७ कोटींची कामे प्रगतिपथावर असून या भूमिगत विद्युतवाहिनी कराराला वेळेत प्राधान्य देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. अतिरिक्त भूमिगत विद्युत वाहिन्यांची कामे करण्यासाठी ३९० कोटी रुपयांना तत्त्वत: मान्यताही देण्यात आली आहे.