राज्यात आघाडीला २८ ते ३० जागा, जयंत पाटील यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 12:57 AM2019-04-28T00:57:44+5:302019-04-28T06:39:30+5:30
देशातील वातावरण आता बदलत असून राज्यात आघाडीला २८ ते ३० जागा मिळतील, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांकडे केला.
ठाणे : देशातील वातावरण आता बदलत असून राज्यात आघाडीला २८ ते ३० जागा मिळतील, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांकडे केला. राज्यातील चौथ्या व अंतिम टप्प्यातील १७ जागांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यानिमित्ताने पाटील हे ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. राज्यात वातावरण आघाडीला पोषक असल्याने अनेक जागांवर आघाडीला यश मिळेल, असे त्यांनी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या झंझावाताचा भाजप-शिवसेनेला नक्कीच तोटा होणार आहे. त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्टपणाने जे काही मुद्दे मांडले, त्यातून सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पडण्याचे काम झाले आहे. राज्यातील जनतेला सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा आता कळून चुकला असल्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो आता जनताच घेईल, असेही ते म्हणाले.
विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे हे आघाडीसोबत एकत्र येतील किंवा नाही, हे त्यावेळीच स्पष्ट होईल. त्यावर, आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांची भाषणे केवळ राज्यात नव्हे तर देशपातळीवर गाजत आहेत. आपण मागणी लावून धरल्याने महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दाव्याकडे पाटील यांचे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले की, विखे काय बोलले, हे नक्की माहीत नाही, परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आघाडीच्या वतीने आंदोलन केले होते. चांदा ते बांदा संघर्षयात्रा काढली होती. विधानसभा बंद पाडण्याचे काम विरोधी पक्षांनी केले.
विरोधी पक्षाच्या दबावामुळेच सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागली. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम आजही सुरू आहे. परंतु, त्याचे श्रेय एका व्यक्तीने घेणे योग्य ठरणार नाही. भाजप, शिवसेना एवढी घाबरली आहे की, आता सगळे हातातून गेल्यावर त्यांच्याकडून केवळ आपली अब्रू वाचवण्यासाठी राज ठाकरे यांनी व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून मांडलेल्या मुद्यांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका त्यांनी केली.