डहाणू तालुक्यात २ महिन्यात २८ बालमृत्यू
By admin | Published: June 19, 2017 03:44 AM2017-06-19T03:44:37+5:302017-06-19T03:44:37+5:30
पालघर जिल्हयात कुपोषणाचे थैमान सुरू असतांनाच डहाणू सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात गेल्या पाच वर्षापासून येथील उपजिल्हा रूग्णालयात
शौकत शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : पालघर जिल्हयात कुपोषणाचे थैमान सुरू असतांनाच डहाणू सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात गेल्या पाच वर्षापासून येथील उपजिल्हा रूग्णालयात बालरोगतज्ञ नसल्याने एप्रिल, मे (२०१७) या दोन महिन्यात हृदयविकार, विचित्र ताप, डायरिया यामुळे व अज्ञात दुर्धर आजारामुळे कमी वजनाची तसेच मुदतीपूर्व जन्मलेली २८ बालके गुजरातच्या बलसाड, सिल्वासा, सिव्हिल हॉस्पिटल ठाणे, खानवेल, उपजिल्हा रूग्णालय कासा तसेच डहाणूच्या खाजगी रूग्णालयात मृत्यूमुखी पडल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे तालुक्याच्या दुर्गम भागात आर्थिक दुर्बल असलेल्या शेकडो आजारी आदिवासी बालकांचे योग्य निदान व उपचार होत नसल्याने ते मृत्यूशी झुंज देत आहेत.
साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या व झपाटयाने नागरिकरण होत असलेल्या डहाणू तालुक्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यात नऊ प्राथमिक आरोग्यकेंद्र, ग्रामीण रूग्णालय बरोबरच कासा, डहाणू, येथे शंभर खाटांचे उपजिल्हा रूग्णालय असलेतरी त्यात विविध आजारांवर उपचार करण्यासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकारी तसेच सिटीस्कॅन, सोनोग्राफी, रक्तपुरवठा करणारी रक्तपेढी, बालरोग, ह्दयरोगतज्ज्ञ नसल्याने ही रूग्णालये केवळ शोभेचे बाहुले ठरले असून दररोज येथील शेकडो रूग्णांना गंभीर आजारावरील उपचार घेण्यासाठी तसेच अपघतात गंभीर जखमी झालेल्या रूग्णांना उपचारासाठी सिल्वासाच्या विनोबा भावे, बलसाडच्या सिव्हील हॉस्पिटल तसेच कस्तुरबा रूग्णालयात जावे लागत आहे. मात्र तिथेही पालघर जिल्हयातील रूग्ण मोठया प्रमाणात येत असल्याने जागेच्या कमतरतेमुळे या रूग्णांना दाखल करून घेण्यात टाळाटाळ केली जात आहे. परिणामी बलसाडहून पुन्हा मुंबई किंवा ठाणे सिव्हील हॉस्पिटल असा पाच ते सहा तासाचा प्रवास सिरीयस रूग्णांना करावा लागतो. अनेक वेळा तर रस्त्यातच रूग्ण मृत्यूमुखी पडत असतो.
डहाणू तालुक्यात गेल्या दोन महिन्यात कासा तसेच डहाणू उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शून्य ते पाच वयोगटातील अज्ञात व दुर्धर आजाराने पिडित असलेल्या बालकांना येथे बालरोगतज्ज्ञ नसल्याने पुढील उपचारासाठी सिल्वासा, बलसाड, खानवेल, ठाणे तसेच डहाणूच्या विविध खाजगी रूग्णालयात पाठविण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान एप्रिल तसेच मे या दोन महिन्यात २८ बालकांचा मृत्यू झाला.
दरम्यान चार ते पाच दिवसांपूर्वी गंजाड, रयतळी भागांतील एका आदिवासी बालकाच्या मेंदूत ताप गेल्याने त्यास गंजाड प्रा. आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यास पुढे डहाणूच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले परंतु तपासणीनंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या बालकाच्या आई वडील व संबंधितांना वलसाड येथे येथे जाण्यासाठी चिठ्ठी दिली. मात्र वलसाड सिव्हील हॉस्पिटल येथे ही त्या बालकाची प्रकृतीची तपासणी केल्या नंतर जव्हार, ठाणे, किंवा मुंबई येथे ेनेण्यास सांगितल्याने शंभर कि.मी. लांब गेलेल्या आदिवासी आई वडीलांनी स्वत:च्या बालकाला नातेवाईकांच्या स्वाधीन करून डहाणू गाठले. त्यानंतर बलसाड येथून नातेवाईकांनी गंभीर आजाराने व तापाने फणफणत असलेल्या बालकाला घेऊन पुन्हा गंजाडला आणले. आज तो चिमुरडा घरीच मृत्यूशी झुंज देत आहे.
अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक (कॅलरीज) व प्रथिनांच्या (प्रोटीन्स) कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त असून आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण ३३.१ टक्के एवढे आहे. आदिवासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजन वाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन ती कमी वजनाची जन्माला येतात, असे अनेक संशोधन व अभ्यासावरून सिध्द झाले आहे. तसेच जन्मानंतर पहिले तीन महिने बालक पूर्णपणे मातेच्या दुधावर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले असणे आवश्यक असते. अपूरा आहार आणि गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी याबाबत आदिवासी समाजामध्ये आवश्यक ती जागरूकता दिसून येत नाही. शेवटच्या तिमाहीमध्ये बाळाचा विकास व वाढ होत असते. अशा कालवधित सुध्दा गर्भवती स्त्रिया श्रमाची कामे करीत असतात. त्या कालावधित त्यांना अतिरिक्त आहार आणि विश्रांतीची गरज असते. तीच मिळत नाही. त्यामुळे राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अनूसूचित क्षेत्रातील गरोदर व स्तनदा मातांना अतिरिक्त पूरक आहार देण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत एक वेळेस चौरस आहार दिला जात असल्याचे सांगितले जाते. परंतु डहाणूच्या दुर्गम भागांतील अनेक गावांत तसेच खेडयापाडयात गरोदर व स्तनदामाता यांना आहार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
दरम्यान डहाणूत ४२० अंगणवाडी व २२० मिनी अंगणवाड्या आहेत. त्यात ० ते पांच वयोगटातील ३२ हजार बालके आहेत. त्यात १८९ मध्यम तीव्र कुपोषीत असून ७६ अति तीव्र कुपोषीत बालके आहेत.