२८९ शिक्षकांची दिवाळी अंधारात ? पगार दोन महिने थकला : सानुग्रह अनुदानाचाही पत्ता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:47 AM2017-10-14T02:47:28+5:302017-10-14T02:47:45+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील २८९ शिक्षकांचे दोन महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. तसेच महापालिकेने जाहीर केलेले १२ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील २८९ शिक्षकांचे दोन महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. तसेच महापालिकेने जाहीर केलेले १२ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. या प्रश्नावर महापालिका प्रशासनाकडून ठोस काही उत्तर दिले जात नाही. सरकारकडून अनुदान आल्यावर देऊ, असा सबुरीचा सल्ला देऊन बोळवण केली जात आहे. त्यामुळे शिक्षकांना दिवाळी अंधारातच साजरी करावी लागणार आहे.
प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नरेंद्र सोंजे आणि सचिव निलेश वाबळे यांनी याविषयी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे आॅक्टोबरच्या वेतनाची रक्कम अग्रीम स्वरूपात १०० टक्के शिक्षकांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेच्या मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, तामीळ माध्यमांच्या ७३ शाळा आहेत. त्यातील जवळपास १० हजार ५०० विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम २८९ शिक्षक करत आहेत. या शाळांमध्ये ११ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. शिक्षकांना महापालिका निधी आणि राज्य सरकारच्या अनुदानातून पगार दिला जातो. ५० टक्के रक्कम महापालिका देते, तर राज्य सरकारकडून ५० टक्के अनुदान मिळते. मात्र, सरकारकडून अनुदानाची रक्कम महापालिकेस मिळालेली नसल्याने मागील वर्षभरापासून शिक्षकांचे पगार उशिराने होत आहे. एका शिक्षकाला किमान ४० हजार रुपये पगार मिळतो. जुलैचा पगार शिक्षकांच्या खात्यात आॅक्टोबरमध्ये पडला आहे. आॅगस्ट व सप्टेंबरचा पगार झालेलाच नाही. आॅक्टोबरचा पगार हा नोव्हेंबरमध्ये न देता तो अग्रीम स्वरूपात आॅक्टोबरमध्ये १०० टक्के जमा करावा, अशी मागणी शिक्षक संघाने केली आहे.
दरम्यान, महापालिकेने दिवाळीनिमित्त १२ हजारांचे सानुग्रह अनुदान कर्मचाºयांना जाहीर केले आहे. मात्र, ही रक्कम घेण्यास कामगार संघटनांनी नकार देत मागील वर्षी इतकी १४ हजार ५०० रुपये रक्कम देण्याची मागणी केली होती. परंतु, हा तिढा सुटलेला नाही.