उपविभागीय अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड; मयत शेतकऱ्यांच्या नावाने २९ लाख लाटण्याचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 06:03 PM2021-10-08T18:03:14+5:302021-10-08T18:03:24+5:30
उल्हासनगर उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कुशिवली गावात कुशिवली लघुपाटबंधारे प्रकल्प सुरू करण्यासाठी भूसंपादन करण्यात आल्या. भूसंपादन केलेल्या जमिनीच्या बदल्यात शासनाकडून भरपाई देण्यात येत आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कुशिवली लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीच्या बदल्यात मयत शेतकऱ्याचे २९ लाख बनावट कागदपत्राद्वारे नुकसानभरपाईची रक्कम लाटण्याचा प्रकार उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कुशिवली गावात कुशिवली लघुपाटबंधारे प्रकल्प सुरू करण्यासाठी भूसंपादन करण्यात आल्या. भूसंपादन केलेल्या जमिनीच्या बदल्यात शासनाकडून भरपाई देण्यात येत आहे. गावाच्या सर्वे नं-३० चे शेतकरी जगत दत्तू म्हात्रे यांच्या नावाने २९ लाख नुकसानभरपाई देण्यासाठी जुलै महिन्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज आला. अर्जाच्या छाननी वेळी अर्जावरील फोटो, सह्या, प्रतिज्ञापत्र, कुटुंबाच्या इतर व्यक्तीच्या साह्य आदी बाबत उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांना संशय आल्यावर, त्यांनी हाजीमलंगवाडी तलाठी यांना सर्वे नं-३० च्या शेतकरी व खातेदाराबाबत सविस्तर माहिती काढा. असे सांगण्यात आले. यावेळी सर्वे नं-३० चे शेतकरी जगत दत्तू म्हात्रे हे मयत असून अर्जातील फोटो, साह्य व प्रतिज्ञापत्र बनावट असल्याचे उघड झाले.
कुशिवली गाव सर्वे नं-३० चे मयत शेतकरी जगत दत्तू म्हात्रे यांच्या नावाने बोगस व बनावट कागदपत्र सादर करून नुकसानभरपाईचे २९ लाख रुपये लाटण्याचा प्रयत्न करणारा कोण? यामागे मोठे रॅकेट आहे का? मयत जगत म्हात्रे यांच्या जागी नुकसानभरपाई प्रक्रियावेळी प्रत्यक्ष उभा राहणारा कोण? असे अनेक प्रश्न उभे ठाकले. उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांच्या सतर्कमुळे सदर प्रकार उघड झाला असून त्यांच्या आदेशाने गुरवारी ७ ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत असून यामागे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रांत अधिकारी कारभारी यांच्या कामाचे कौतुक
शहरातील सनद प्रकरणी उपविभागीय कार्यालय नेहमी वादात राहिले असून खुल्या जागा, विविध शासकीय जागा, पोलीस वसाहत आदी ठिकाणी सनद यापूर्वी दिल्या आहेत. तत्कालीन उपविभागीय अधिकारी जगजितसिंग गिरासे यांच्या कालावधीत देण्यात आलेल्या एकून २५४ सनदची चौकशी शासनस्तरावर सुरू असून त्यापैकी ७९ सनद रद्द केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांनी दिली. त्यांच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.