29 मनोरुग्णांना मिळाली सुट्टी, जागृती संस्थेत पुनर्वसन; स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी पंखांना देणार बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 02:05 PM2024-03-08T14:05:05+5:302024-03-08T14:05:42+5:30
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने २९ मनोरुग्णांना जागृती पुनर्वसन केंद्रात त्यांची रवानगी केली आहे. अशा मनोरुग्णांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ दिले जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नेताजी मुळीक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ठाणे : नातेवाइकांनी नाकारलेल्या, नातेवाईक सापडत नसलेल्या, कुटुंब हयात नसलेल्या अशा मनोरुग्णांना आता मनोरुग्णालयातून कायमची सुटी मिळाली आहे. कुटुंबाने आधार दिला नसला तरी पुनर्वसन केंद्राचा मात्र त्यांना आधार मिळाला आहे.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने २९ मनोरुग्णांना जागृती पुनर्वसन केंद्रात त्यांची रवानगी केली आहे. अशा मनोरुग्णांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ दिले जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नेताजी मुळीक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८७ मनोरुग्णांना मुक्त वातावरणात राहता येणार आहे. मानसिक व शारीरिकदृष्ट्या स्थिर असलेल्या ५२ मनोरुग्णांची ‘जागृती’ पुनर्वसन केंद्रात रवानगी केली जाईल तर मानसिक आजारातून बरे झालेल्या; पण पॅरालिसिस, दिव्यांग अशा इतर आजाराने त्रस्त असलेल्या ३५ जणांची रवानगी विशेष पुनर्वसन केंद्रात केली जाणार आहे. तेथे त्यांची देखभाल करण्याकरिता कर्मचारी तैनात असतील.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात १५ जणांना तर आता २९ जणांना जागृती पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात आले. अन्य जणांची टप्प्याटप्प्याने तपासणी करून पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
कलागुणांना दिला जातो वाव
१८ ते ५५ वयोगटातील २९ पैकी १४ महिला, तर १५ पुरुषांना ‘जागृती’मध्ये पाठवले आहे. दिव्यांग, गतिमंद मनोरुग्णांसाठी विशेष पुनर्वसन केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. मनोरुग्णालयातून या केंद्राची नावे पाठवली असली तरी शासन स्तरावर योग्य ती पुनर्वसन केंद्राची पडताळणी करून त्यांना ठेवले जाईल, असे डॉ. मुळीक म्हणाले. तेथे त्यांच्या अंगी असलेल्या कला, कौशल्यांना वाव देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास प्रवृत्त केले जाते.
सध्या मनोरुग्णालयात ७८५ मनोरुग्ण
- सध्या मनोरुग्णालयात ७८५ मनोरुग्ण असून पैकी ४९१ पुरुष, तर २९४ स्त्री मनोरुग्णांची संख्या आहे. यातील किती तरी मनोरुग्ण हे औषधोपचाराने बरे झाले आहेत.
- ‘मेंटल हेल्थ केअर’ कायद्यानुसार २०१७ नुसार मानसिकदृष्ट्या बरे झालेल्यांना मनोरुग्णालयात ठेवता येत नाही; परंतु काहींचे नातेवाईक असून स्वीकारत नाही तर काहींचे नातेवाईक सापडत नाही, अशा रुग्णांचे करायचे काय, असा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा त्यांना शासनाने पुनर्वसन केंद्राची वाट मोकळी करून दिली.