दिशा मारोला केंद्र सरकारकडून ३ लाखांची मदत
By admin | Published: March 9, 2016 05:49 AM2016-03-09T05:49:53+5:302016-03-09T05:49:53+5:30
अपंगत्वावर मात करीत यूएस स्पेशल आॅलिम्पिकमध्ये वर्ल्ड समर गेम्समध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावत अटकेपार झेंडा रोवणाऱ्या दिशा मारोच्या कर्तृत्वाची दखल
वैभव गायकर, पनवेल
अपंगत्वावर मात करीत यूएस स्पेशल आॅलिम्पिकमध्ये वर्ल्ड समर गेम्समध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावत अटकेपार झेंडा रोवणाऱ्या दिशा मारोच्या कर्तृत्वाची दखल खुद्द केंद्र सरकारने घेतली आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने मोदी सरकारने दिशाच्या बँक खात्यात सुमारे ३ लाख रोख रक्कम जमा करून तिला खऱ्या अर्थाने महिला दिनाची अनोखी भेट दिली आहे.
अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पार पडलेल्या आॅलिम्पिक्स वर्ल्ड समर गेम्सच्या ४० मी. फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये पनवेलच्या दिशा मारू (२७) हिने ४० मीटर फ्री स्टाइल प्रकारात रौप्यपदक मिळवून साऱ्यांनाच अवाक केले. जन्मापासून अपंगत्व व गतिमंद असलेल्या दिशाने याआधी २५ मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत कांस्य पदक मिळविले आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून पोहण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या दिशाने २०१३ मध्ये कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्पेशल आॅलिंपिक स्पर्धेत फ्री स्टाइल प्रकारात कांस्य पदक, कर्नाटकातील मोंडा येथे फ्री स्टाइल व ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सुवर्ण आणि रिले प्रकारात कांस्यपदक मिळवले आहे. तसेच आॅस्ट्रेलिया येथे झालेल्या स्पेशल आॅलिम्पिक आशिया पॅसिफिक स्पर्धेत रिले प्रकारात दोन कांस्यपदके मिळवली आहेत. दिशा गेली २३ वर्षांपासून स्वामी ब्रम्हानंद शाळेची विद्यार्थिनी आहे. शाळेचे संस्थापक शिरीष पुजारी व प्राचार्या सुकन्या वेंकटरामन यांनी या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, आॅलिम्पिक्स वर्ल्ड समर गेम्सच्या ४0 मी. फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये रौप्यपदक मिळवल्याबद्दल दिशाला केंद्र सरकारकडून मदत जाहीर झाली होती.