स्वाइन फ्लूचे ३, तर डेंग्यूचे ९ रूग्ण, उल्हासनगरात तापाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 02:44 AM2019-08-15T02:44:54+5:302019-08-15T02:45:21+5:30
कुर्ला कॅम्प परिसरातील संपत राऊत यांना स्वाइन फ्लू निष्पन्न झाल्याने त्यांना मुंबईला हलवण्यात आले.
उल्हासनगर - कुर्ला कॅम्प परिसरातील संपत राऊत यांना स्वाइन फ्लू निष्पन्न झाल्याने त्यांना मुंबईला हलवण्यात आले. यापार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने राऊत यांच्या कुटुंबासह शेजारील शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी केली. एका महिन्यात ३ स्वाइन फ्लूच्या, तर डेंग्यूच्या ९ रूग्णांची नोंद झाल्याची माहिती डॉ. राजा रिजवानी यांनी दिली.
कुर्ला कॅम्प परिसरातील ७० वर्षीय संपत राऊत यांना ताप आल्याने स्थानिक रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. तपासणी अहवालात त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे उघड झाल्यावर त्यांना मुंबई येथे हलवल्याची माहिती मनसेचे माजी शहराध्यक्ष बाळा गुंजाळ यांनी दिली. याप्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून, महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी पालिका आरोग्य पथकाच्या मदतीने राऊत यांच्या कुटुंबासह शेजाऱ्यांचीही आरोग्य तपासणी केली. व्हायरल तापाची साथ शहरात सुरू असल्याची माहिती डॉ. रिजवानी यांनी दिली असून, एक महिन्यात ३ स्वाईन फ्लूच्या, तर डेंग्यूच्या ९ रूग्णांची नोंद पालिका दफ्तरी झाल्याचे त्यांनी सांगितले.
स्वाइन फ्लू आणि डेंग्यूचे रूग्ण आढळलेल्या परिसरातील शेकडो जणांची आरोग्य तपासणी पालिकेच्या आरोग्य पथकाने केली. रूग्णांच्या कुटुंब सदस्यांची तपासणी करून अहवालानंतर त्यांच्यावर औषधोपचार केले जाणार आहे.
लवकरच विशेष कक्ष
व्हायरल तापाच्या रूग्णांची संख्या हजारोच्या संख्येत असून, शहरातील दवाखाने, पॅथालॉजींना दररोजचा अहवाल मागवण्यात आला आहे. विविध ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले असून, मध्यवर्ती रूग्णालयात विशेष कक्ष उघडला जाणार आहे.