भिवंडीतील १६ शाळांच्या इमारत नूतनीकरणासाठी ३० कोटींचा निधी, रईस शेख यांच्या प्रयत्नांना यश
By नितीन पंडित | Published: November 19, 2022 01:19 PM2022-11-19T13:19:26+5:302022-11-19T13:19:53+5:30
महापालिकेच्या १६ शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण व सुसज्ज करण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे.
भिवंडी : भिवंडीतील महापालिका शाळांचे रुपडे लवकरच बदलणार असून त्यासाठी सपाचे आमदार रईस शेख यांनी राज्य सरकारकडून ३० कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. त्याद्वारे महापालिकेच्या १६ शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण व सुसज्ज करण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे.
शेख यांनी २२ जुलै २०२२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भिवंडी मनपाच्या शाळांच्या दुरावस्थेची व्यथा मांडत सदर शाळा इमारती जीर्ण झाल्याने दुरुस्ती व नूतनीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचा मुद्दा अधोरेखित केला होता.त्यानुसार शहरातील १६ शाळांची दुरुस्ती आता होणार आहे. ज्यात शांतीनगर पोलीस चौकी मनपा शाळा क्र.९२,९९ व १०० च्या आधुनिकीकरणासाठी ५ कोटी,मनपा शाळा क्र.३४ व ८४ मधील वाचनालय इमारतीचे नूतनीकरण, पेव्हर ब्लॉक, शाळेच्या आवारात सुरक्षा भिंत, उद्यान व मुख्य गेट बांधकामासाठी ४ कोटी रुपये, तसेच बाळा कंपाऊंडमधील शाळा क्र.८६ च्या नूतनीकरणासाठी ३ कोटी रुपये,नवी वस्ती परिसरातील शाळा क्र.६८ च्या नूतनीकरणासाठी १.२५ कोटी रुपये, गैबी नगर शाळा क्र. ६२ व २२ च्या नूतनीकरणासाठी ५ कोटी, नवी वस्ती गौतम कंपाऊंड समोरील शाळा क्र. ५७,९५ च्या नूतनीकरणासाठी १.७५ कोटी, चिश्तिया मशिदीजवळील शाळा क्र.१७ नूतनीकरणासाठी १ कोटी, शाळा क्र.८१ सब्जी मार्केट शांतीनगरच्या नूतनीकरणासाठी १ कोटी,संजय नगर शाळा क्र.१०३ च्या नूतनीकरणासाठी १ कोटी, गुलजार नगरच्या मनपा शाळा क्र.७० च्या नूतनीकरणासाठी २ कोटी रुपये, रावजी नगर मनपा शाळा क्र.५४,७३ गणेश नगर,कामतघर मनपा शाळा नूतनीकरणासाठी दीड कोटी रुपये शाळा क्र.४१ च्या नूतनीकरणासाठी १ कोटी आणि नवी वस्ती शाळा क्र.८७ च्या नूतनीकरणासाठी १ कोटी ५० लाख रुपये अशा प्रकारे एकूण ३० कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती शेख यांनी शासनाकडे होती.
आमदार रईस शेख यांच्या या विनंतीचा गांभीर्याने विचार करून ३० कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे. ठाणे जिल्हा नियोजन समितीचे जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने आमदार रईस शेख यांना त्यासंदर्भात लेखी पत्र देखील पाठवले असलंयाची माहिती आमदार शेख यांनी दिली आहे.तसेच महापालिकेच्या शाळांचे मूल्यांकन तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने भिवंडी महापालिकेला पत्र देखील दिले असून जिल्हा नियोजन समितीने भिवंडी नगरपालिकेला पत्र लिहून पालिकेच्या शाळांचे मूल्यांकन लवकरात लवकर तयार करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे भिवंडी पालिकेच्या शाळांच्या इमारतींचे लवकरच रुपडे पलटणार आहे.