कोकिळा व्रताचा ३० पासून श्रीगणेशा
By admin | Published: July 30, 2015 12:32 AM2015-07-30T00:32:16+5:302015-07-30T00:32:16+5:30
आम्रवृक्षावर मधुर स्वरात कुहूकुहू करणाऱ्या कोकिळा शब्दश्रवणाचा अंतर्भाव असल्याने निसर्ग महिमा व पक्षी-जाती-संवर्धन असा कोकिला व्रताचा मुख्य उद्देश आहे.
ठाणे : आम्रवृक्षावर मधुर स्वरात कुहूकुहू करणाऱ्या कोकिळा शब्दश्रवणाचा अंतर्भाव असल्याने निसर्ग महिमा व पक्षी-जाती-संवर्धन असा कोकिला व्रताचा मुख्य उद्देश आहे. शारीरिकदृष्ट्या सामान्य व कुरूप व्यक्तींमध्येही चांगले गुण असतात. त्यामुळे निसर्गरचनेत प्रत्येक घटकाला विशिष्ट स्थान आहे, ही या व्रताची मुख्य संकल्पना आहे. त्यामुळेच आंब्याची लाकडे तोडणे व कोकिळादींना पिंजऱ्यात कोंडणे, या काळात बिलकूल स्थान नाही, हे ध्यानात घेऊन आजकालच्या सर्व सुशिक्षित स्त्रियांनी समाजप्रबोधन, निसर्ग व पक्षी संरक्षण, सामाजिक एकोपा व परस्पर स्नेहवृद्धीसाठी हे व्रत श्रद्धेने व सुजाणपणे करावे, अशी अपेक्षा आहे.
तब्बल दीड तपानंतर येणारे
तब्बल दीड तपानंतर येणारे कोकिळा व्रत इ.स. १७९० नंतर यंदा सिंहस्थ पर्वणीत आल्याने त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महिलावर्गात या व्रताची उत्सुकता वाढली आहे. महिनाभर चालणाऱ्या या व्रताचा श्रीगणेशा ३० जुलैपासून होत आहे.
स्वाभाविकच धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या महिलावर्गात या अनोख्या कोकिळा व्रताची सिद्धता करीत असून साधारण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हे व्रत केवळ तीन किंवा चार
वेळेस येते तसेच अगदी बालपणीचे व्रत आठवत नसल्याने
तरु ण स्त्रियांमध्ये याबद्दल श्रद्धा, कुतुहल प्रकर्षाने व्यक्त होत आहे.
आख्यायिका
माहेरी दक्ष प्रजापतीकडे यज्ञ सोहळा असूनही आमंत्रण नसलेली पार्वती शिवशंकराच्या सूचनेनंतरही माहेरच्या ओढीने त्या सोहळ्यास गेली. तेथे आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने यज्ञकुंडात उडी घेऊन देहत्याग केला. देवाच्या विनंतीवरूनही शंकरांनी शिरच्छेद केलेल्या दक्ष प्रजापतीस मेषाचे शिर बसवून पुनर्जीवित केले, अशी पौराणिक आख्यायिका आहे.
आत्मत्याग दोषामुळे तू कोकिळा होऊन फिरशील, असा पार्वतीला शाप दिल्यामुळे पार्वतीस कोकिळा स्वरूप प्राप्त झाले. या रूपात गणपती, ब्रह्मा, विष्णू यांनी तिची पूजा, उपासना केली. या व्रतामुळे स्त्रियांचे कल्याण व सौभाग्यवृद्धी होईल, असा शंकरांनी वर दिला. गुरू वसिष्ठांच्या उपदेशानुसार शत्रुघ्नाची पत्नी कीर्तिमालेने प्रथम हे व्रत केले. श्रीकृष्णाच्या सूचनेनुसार द्रौपदीने या व्रताचा अंगीकार व प्रसार केला, अशी श्रद्धा आहे.
२२५ वर्षांनंतर दुर्मीळ योग
अधिक आषाढ मासानंतर म्हणजे १८ वर्षांनंतर येणारे कोकिळा व्रत यंदा ३० जुलै ते २९ आॅगस्टदरम्यान साजरे होत आहे. यापूर्वी हे व्रत १९९६ मध्ये साजरे झाले. सिंहस्थ पर्वणीत हे व्रत यापूर्वी शके १७१२ म्हणजे इ.स. १७९० मध्ये आले होते. म्हणजे, तब्बल २२५ वर्षांनंतर हा दुर्मीळ दुग्धशर्करायोग येत आहे.
असे करतात व्रत...
प्रथम दिवशी संकल्प व विधिवत
पूजा करून महिनाभरात उपोषण,
नक्त भोजन, भूशय्या, कोकिळा शब्दश्रवण व धार्मिक ग्रंथवाचन, अन्नदान, परोपकार कृत्ये असे
नियोजन असते. आपल्या शक्ती व इच्छेनुसार किमान सात किंवा तीन दिवस तरी हे व्रत करावे, असे धार्मिक शास्त्र सांगते.
- सुहास शूर, जामदा, ता. चाळीसगाव