‘अपना घर’ योजनेतील ३० मजले बेकायदा, पालिकेचे कारवाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:40 AM2020-03-03T05:40:01+5:302020-03-03T05:40:05+5:30
बेकायदा कामांना पाठीशी घालणाऱ्या महापालिकेला विधिमंडळ अधिवेशनात आमदारांनी अपना घर योजनेतील बेकायदा बांधकामांचा मुद्दा उचलून दणका दिला आहे.
मीरा रोड : भाजपचे मीरा-भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित बेकायदा कामांना पाठीशी घालणाऱ्या महापालिकेला विधिमंडळ अधिवेशनात आमदारांनी अपना घर योजनेतील बेकायदा बांधकामांचा मुद्दा उचलून दणका दिला आहे. पालिकेच्या नगररचना विभागाने प्रभाग अधिकाºयास लेखी पत्र देऊन अपना घर योजनेतील वाढीव बेकायदा बांधकामांची यादी देऊ न तोडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. १० इमारतींमध्ये तब्बल ३० बेकायदा वाढीव मजल्यांचे बांधकाम झाले आहे. प्रभाग अधिकारी मात्र कारवाईस टाळाटाळ करत आहे.
७११ कन्स्ट्रक्शन कंपनीची हाटकेश भागात ‘अपना घर’ ही निवासी संकुल वसाहतीची योजना आहे. अपना घर ‘ए’ व ‘बी’साठी फेब्रुवारी २०१७ मध्ये आयुक्त रजेवर असताना नगररचना विभागाने बांधकाम परवानगी दिली होती. तर ‘ए’ इमारत प्रकल्पास २०१८ मध्ये सुधारित परवानगी दिली गेली.
नंतर या दोन्ही इमारत प्रकल्पांसाठी सुधारित परवानगी मागण्याचा प्रस्ताव आला असता महापालिकेने तो ना-मंजूर केला होता. या जागेवर वाढीव तसेच नियमबाह्य बांधकाम होऊनही नगररचना विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यासह अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला होता.
बेकायदा वाढीव बांधकामप्रकरणी विधिमंडळ अधिवेशनात आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर नगररचना विभागाचे सहायक संचालक मिलिंद आवडे यांनी, या वाढीव बांधकामांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, असे प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांना २५ फेब्रुवारीला पत्राद्वारे कळवले होते. सोबत त्यांनी वाढीव बेकायदा बांधकामांचा नकाशा व यादी जोडली होती. त्यामुळे आमदारांनी बेकायदा बांधकांमंचा मुद्दा उचलून चांगलाच दणका दिला आहे.
>११ हजार ७०० चौ.मी. बांधकाम बेकायदा
अपना घर योजनेच्या ए व बी मध्ये १० इमारतींमध्ये तळ अधिक भाग : २ मजल्यापासून स्टील्ट अधिक नऊ मजल्यांपर्यंतची परवानगी दिली आहे. पण कंपनीने ६ ते १४ मजल्यांपर्यंतच्या इमारतींची बांधकामे केली आहेत. त्यानुसार ३० मजले वाढीव असून तब्बल ११ हजार ७०० चौ.मीटर इतके बांधकाम बेकायदा ठरले आहे.