कसाऱ्यात ३० तास ब्लॅकआउट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:46 AM2021-09-05T04:46:38+5:302021-09-05T04:46:38+5:30
कसारा - शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र विज वितरण कंपनी व भारत पेट्रोलियम कॅर्पोरेशन कंपनी ने बी. ...
कसारा - शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र विज वितरण कंपनी व भारत पेट्रोलियम कॅर्पोरेशन कंपनी ने बी. पि. सी.एल. पावर हाऊसशी निगडित असलेल्या कसारा , वाशाळासह काही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला होता. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेसाठी खंडीत केलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज वितरणसह बी. पी. सी .एल कंपनीला अपयश आल्याने कसारावासियांना तब्बल ३० तासाच्या ब्लॅक आऊटला समोरे जावे लागले.
सकाळी १० वाजल्यापासून दुरुस्ती कामाला वाशाळा सब सेंटर येथे सुरुवात झाल्यानंतर हाय टेंशनच्या वायरी बदलण्याचे काम देखील हाती घेतले होते. परिणामी कर्मचारी व अधिकारी यांना रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती कामात अपयश आल्याने रात्री ११ वाजता पडघा , भिवंडी येथील कर्मचाऱ्यांना सब सेंटर येथे बोलावले. रात्रीचा अंधार व पाऊस यामुळे कर्मचाऱ्यांना दुरुस्ती मोहिमेत अडथळे निर्माण होत होते. रात्री एकच्या दरम्यान अचानक घाटघर वीज प्रकल्पातुन येणाऱ्या उच्चदाब वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने कर्मचाऱ्यांचे काम वाढले. शनिवारी सकाळी घाटघर येथून येणारी उच्चदाब वीज वाहिनी बदलण्यात आली व शनिवारी दुपारी ३ वाजता कसाऱ्यासह अन्य भागातील वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र दूध, वैद्यकीय व्यवसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
दरम्यान शुक्रवार सकाळपासून दुरुस्ती कामासाठी झटत असलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेत तब्बल ३० तासांनी पुरवठा सुरळीत केला, या कर्मचाऱ्यांचे ग्राहकांकडून कौतुक केले जात आहे.