तांत्रिक चुकीमुळे शून्य गुण मिळालेल्या आयटीआयचे ३० विद्यार्थी झाले उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 03:58 PM2020-07-16T15:58:34+5:302020-07-16T16:10:10+5:30
मनविसेमुळे हक्काचे गुण मिळाल्याची विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली .
ठाणे : वागळे इस्टेट येथील आयटीआय परीक्षेदरम्यान चुकीचे मार्गदर्शन केल्याने आणि तांत्रिक चुकीमुळे शून्य गुण देण्यात आलेले ते ३० विद्यार्थी ऊत्तीर्ण झाले असल्याने त्यांनी एकच जल्लोष केला. या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तात्काळ आयटीआय महाविद्यालयावर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. मनविसेमुळे आम्हाला हक्काचे गुण मिळाल्याची प्रतिक्रिया या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा अर्थात आयटीआयच्या माध्यमातून जुलै २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल ८ डिसेंबर रोजी ऑनलाईन घोषित करण्यात आला. प्रथम वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांच्या या वार्षिक परीक्षेत टर्नर व फिटर प्रवर्गातील तब्बल ३० जणांना शून्य गुण देण्यात आले. याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला. त्यावेळी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना दाद दिली नाही. वर्ष वाया जाण्याची भीती असल्याने या विद्यार्थ्यांनी मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांच्या आलेल्या तक्रारी लक्षात घेता विद्यार्थी सेनेने महाविद्यालयात धडक देऊन प्रशासनाला धारेवर धरले. पर्यवेक्षक आणि तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडला होता असे विद्यार्थ्यांनी सांगितले. आम्ही पुन्हा परीक्षेला बसण्याची तयारी केली होती. पण आमची चूक नसताना आम्हाला मनस्ताप भोगावा लागला होता. दिल्लीहून आलेल्या आयटीआयचे संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास करू असे सांगितले. नुकताच ऑनलाइन निकाल तपासला तेव्हा आम्ही पास झाल्याची आनंदाची बातमी मिळाली. हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी महाविद्यालय प्रशासनाने ही चूक पर्यवेक्षकांबरोबर तांत्रिक चूक असल्याचे मान्य करत ही चूक विद्यार्थ्यांच्या माथ्यावरही त्यांनी मारली.
---------------------------------------------
पर्यवेक्षकाच्या चुकी मुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार होते परंतु विद्यार्थ्यांनी मनविसेकडे समस्या मांडली त्यांनंतर आम्ही श्री. शाम अंबाळकर यांच्या मार्फत दिल्ली येथील आयटीआय मुख्य कार्यालयाशी पाठपुरावा करून मुलांची तक्रार दूर केली. मुलाचे एक वर्ष वाचवू शकलो याचा आम्हाला आनंद आहे - संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, मनविसे
--------------------------------------------
हॉल तिकिटावर पेपरचा क्रमांक नसल्याने पर्यवेक्षक आणि विद्यार्थी संभ्रमात पडले. परंतु तांत्रिक चूक आणि पर्यवेक्षकाच्या चुकीबरोबर विद्यार्थी पेपर लिहीत असल्याबे त्यांचीही चूक असल्याचे प्राचार्य शाम अंबाळकर यांनी सांगितले. संपूर्ण वर्ग नापास झाला म्हणून पेपरची तपासणी झाली, एखाद दुसरा विद्यार्थी असता तर पेपर पुन्हा तपासला ही नसता असे उत्तरही त्यांनी दिले. तसेच आयटीआय, दिल्लीच्या प्रशिक्षण महानिर्देशक यांची स्वतः भेट घेऊन तांत्रिक चूक पण झाल्याची खात्री पटवून दिली आणि भविष्यात अशी घटना घडू नये याची काळजी घेणारी असल्याचे अंबाळकर म्हणाले.