टेंभी नाक्याजवळ ३० वर्षीय अत्यवस्थ रुग्णाची तडफड; रुग्णवाहिका आली दीड तास उशिरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 04:07 AM2020-05-09T04:07:06+5:302020-05-09T04:07:32+5:30
वाडिया हॉस्पिटल रात्री बंद असल्याने काही सुचेना : खोकल्याने हैराण
ठाणे : रस्त्यावर तडफडत पडलेल्या कोरोना रुग्णांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आजवर व्हायरल झालेत. पण जीवाचा थरकाप उडवणारा हा अनुभव ठाणेकरांनी गुरुवारी रात्री प्रत्यक्ष घेतला. टेंभी नाका येथील महापालिकेच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये कोरोनाची तपासणी करण्यासाठी आलेल्या एका ३0 वर्षीय तरुणाला तब्बल दीड तास रुग्णवाहिकेसाठी तडफडत राहावे लागले. हा तरुण सतत खोकत असल्यामुळे इच्छा असूनही वाटसरुंना त्याची मदत करता आली नाही. या घटनेच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराची झलक पुन्हा एकदा पाहण्यास मिळाली.
महापालिकेच्या वतीने टेंभी नाका येथील वाडिया हॉस्पिटलमध्ये कोरोनाची तपासणी सुरु करण्यात आली आहे. या परिसरातील संशयित तपासणीसाठी येथे येत असतात. असाच एक रुग्ण गुरुवारी सायंकाळी वाडिया हॉस्पिटल येथे आला होता. परंतु हॉस्पिटलच्या तपासणीचे कामकाज सहा वाजताच संपल्याने येथे कोणीही नव्हते. त्यामुळे या रुग्णाला कोठे जावे, हे कळत नव्हते. शिवाय त्याला जोरात खोकला येऊन उलट्याही होत होत्या. त्यामुळे त्याची प्रचंड तडफड होत होती. अशा परिस्थितीतही काहींनी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता, तो आरडाओरÞडा करुन आपल्याजवळ येऊ नका, असे सांगत होता. तरीही कुणी चुकून जवळ आल्यास, जवळ दिसेल ती वस्तू तो फेकून मारत होता. आपल्यामुळे संसर्ग होऊ नये म्हणून तो स्वत:हून काळजी घेत होता.
या रुग्णाची माहिती मिळाल्यानंतर याच परिसरात कार्यरत असलेले शिवसेनेचे नगरसेवक सुधीर कोकाटे आपल्या कार्यकर्त्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी आपल्याला रुग्णालयात दाखल करण्याची विनवणी या रुग्णाने हात जोडून केली. त्यांनी तत्काळ महापालिकेत संपर्क साधून रुग्णवाहिका मागवली. परंतु तब्बल दीड तासानंतर रुग्णवाहीका घटनास्थळी आली. दरम्यान रुग्णवाहीका येत नसल्याने अखेर कोकाटे यांनी ही माहिती महापौर नरेश म्हस्के यांना कळवली. महापौरांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्यानंतर रुग्णवाहिका पाठवण्यात आली. तोपर्यंत या रुग्णाला लांबून पाण्याचा बाटल्या दिल्या जात होत्या. त्याला सातत्याने तहान लागत असल्याने काही मिनिटातच तो बाटल्या रिकाम्या करीत होता. त्याची तडफड पाहून येथे जमलेल्या लोकांचे डोळे पाणावले. आतापर्यंत केवळ सोशल मिडियावर अशी विदारक दृश्य पाहणाºया ठाणेकरांनी गुरुवारी सायंकाळी स्वत: ही तडफड अनुभवल्याने अनेकांचा थरकाप उडाला.
अखेर कळवा रुग्णालयात दाखल
रुग्णवाहिका आल्यानंतर सोबत पोलीस असतील तरच त्याला घेऊन जाऊ, असे रुग्णवाहीका चालकांनी स्पष्ट केले. त्यानंतर तिथेच गस्तीवर असलेला एक पोलीस त्यासाठी तयार झाला आणि त्या रुग्णाला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अद्याप अहवाल आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.