लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 12:53 PM2019-07-22T12:53:17+5:302019-07-22T14:03:48+5:30
गर्दीमुळे लोकलमधून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. सविता नाईक असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे.
ठाणे - मध्य रेल्वेच्या कल्याण, डोंबिवली या स्थानकांवर कायम गर्दी होते. डोंबिवलीत तर जलद लोकलमध्ये ऐन गर्दीच्या वेळी चढणं हे एक दिव्य असतं. अशा गर्दीच्या वेळीच लोकलमधून पडण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. यामध्ये काहींचा मृत्यूही होतो. अशीच एक घटना घडली आहे. गर्दीमुळे लोकलमधून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला आहे.
सविता नाईक असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जीआरपीचं पथक दाखल झालं आहे. या तरुणीचा मृतदेह डोंबिवलीत आणला जाणार आहे. लोहमार्ग पोलीस सतीश पवार यांनी ही माहिती दिली असून अन्य शोध कार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीहून सुटलेल्या सीएसएमटी फास्ट लोकलमधून सविताचा खाली पडून तिचा मृत्यू झाला. सविता नाईक ही 30 वर्षाची आहे. कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून तिचा मृत्यू झाला.
गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये प्रवेश न मिळाल्याने दरवाजाला लटकून प्रवास करणाऱ्या रविकांत भगवान चाळकर (45) यांचा काही दिवसांपूर्वी सकाळी धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. रविकांत चाकळर हे पलावासीटी, काटई, डोंबिवली (पूर्व) येथील रहिवासी होते. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्यांना चढता आले नाही. त्यामुळे ते ते दरवाजाला लटकून प्रवास करत होते. यादरम्यान, त्यांचा तोल गेला आणि ते डोंबिवली आणि कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून खाली पडले होते.
मोबाइल चोराचा पाठलाग करताना लोकलमधून पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना ही रविवारी (8 जुलै) समोर आली होती. पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड स्टेशनवर ही घटना घडली होती. शकील अब्दुल गफार शेख असे या प्रवाशाचे नाव होतं. चर्चगेटला जाण्यासाठी शकील यांनी रविवारी सकाळी धिमी लोकल पकडली. त्यावेळी त्यांचे काही सहकारी ही लोकलमध्ये होते. लोकल 6.45 च्या सुमारास चर्नी रोड स्थानकात पोहचली त्यावेळी चोराने शकील यांच्या हातातील मोबाइल हिसकावून घेत पळ काढला. धावत्या लोकलमधून तो प्लॅटफॉर्मवर उतरला आणि पळाला. शकील यांनी चोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान लोकलने वेग घेतला होता. चोराला पकडण्यासाठी ते धावत्या ट्रेनमधून उतरले. मात्र वेगाचा अंदाज न आल्याने प्लॅटफॉर्म आणि लोकल यांच्या पोकळीत पडले. यामध्ये शेख यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.