महाराष्ट्र दहीहंडी समितीत फूट; ३०० गोविंदा पथके पडली बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 12:30 PM2021-08-27T12:30:02+5:302021-08-27T12:30:28+5:30

ठाणे शहर हे दहीहंडी नगरी म्हणून ओळखले जाते, असे असतानाही दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याने ठाणे शहरातील एकाही गोविंदा पथकाला बोलावले नसल्याची नाराजी ठाणे समन्वय समितीने व्यक्त केली

300 Govinda squads quits Maharashtra Dahihandi Samiti pdc | महाराष्ट्र दहीहंडी समितीत फूट; ३०० गोविंदा पथके पडली बाहेर

महाराष्ट्र दहीहंडी समितीत फूट; ३०० गोविंदा पथके पडली बाहेर

Next

- प्रज्ञा म्हात्रे 
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुख्यमंत्री यांच्यासोबत सोमवारी झालेल्या गोविंदा पथकांच्या बैठकीत ठाण्यातील एकाही गोविंदा पथकाला बोलावले नसल्याने ठाणे शहरासह जिल्ह्यातील ३०० गोविंदा पथकांनी दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य या मुख्य समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हे नाराज गोविंदा लवकरच एक बैठक घेऊन नव्या समन्वय समितीची स्थापना करणार आहेत.

ठाणे शहर हे दहीहंडी नगरी म्हणून ओळखले जाते, असे असतानाही दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याने ठाणे शहरातील एकाही गोविंदा पथकाला बोलावले नसल्याची नाराजी ठाणे समन्वय समितीने व्यक्त केली, तसेच या बैठकीची कल्पनाही दिली नसल्याचे महाराष्ट्र समन्वय समितीचे उपाध्यक्ष समीर पेंढारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. महाराष्ट्र समन्वय समितीशी ठाणे जिल्हा समन्वय समिती संलग्न आहे. छोटे-मोठी मंडळे मिळून ३०० हून अधिक मंडळे ठाणे जिल्हा समन्वय समितीशी जोडली गेली आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल तेव्हा ठाणे शहराच्यावतीने एका गोविंदा पथकाच्या किमान एका पदाधिकाऱ्याला तरी मुख्य समितीकडून निमंत्रित केले जाईल, अशी ठाणे शहरातील गोविंदा पथकांची आशा होती. मात्र, ही आशा त्यांची फोल ठरली. मुंबईतील सात ते आठ पदाधिकारीच उपस्थित होते. त्यात एखादा ठाण्याचा पदाधिकारी घेऊ शकत होते, असे गोविंदा पथकांनी सांगितले. त्यामुळे मुख्य समन्वय समिती आणि ठाणे जिल्हा समन्वय समितीमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. 
नाराज झालेले गोविंदा पथक लवकरच नवीन समन्वय समितीची स्थापना करणार आहेत. मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतून जे गोविंदा सोबत येतील त्यांना या समितीत घेतले जाईल. तसेच, लवकरच रूपरेषा ठरविली जाईल, असे ठाण्यातील गोविंदा पथकांनी सांगितले. 

गोविंदा पथकांच्या बाजूने या बैठकीत कोणती भूमिका मांडली, याची कल्पना ठाणे शहरातील गोविंदा पथकांना नाही. ठाण्यातील गोविंदा पथकांना विश्वासात न घेता ही बैठक झाल्याने मुख्य समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य समितीवर ठाण्यातील दोन पदाधिकारी असतानादेखील निमंत्रित केले नाही. 
- समीर पेंढारे, उपाध्यक्ष,
दहीहंडी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

आम्ही वेगळी समिती स्थापन करणार आहोत. मुख्य समिती आम्हाला विश्वासात घेत नाही म्हणून आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.      
    - नीलेश वैती, जतन गोविंदा उत्सव मंडळ

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ठाण्यातून एकाला सहभागी केले नाही. येथेदेखील समन्वय समितीचे पदाधिकारी असून, एकाला तरी निमंत्रित करायला हवे होते. 
- सचिन खारकर, सहयोग गोविंदा पथक

Web Title: 300 Govinda squads quits Maharashtra Dahihandi Samiti pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.