३०० घड्याळे चोरली, ‘कालू’ ला अखेर बेड्या; सीसीटीव्हीमुळे लागला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 09:09 AM2024-07-15T09:09:35+5:302024-07-15T09:10:08+5:30
नगरातील रहिवासी रितेश आडिया (वय ४८) यांच्या घड्याळाच्या गोदामात विक्रीसाठी ३०० पेक्षा अधिक मनगटी घड्याळे त्यांनी ठेवली होती.
ठाणे : कळव्यातील मनीषानगर भागातील दुकानाच्या गोदामातून सुमारे ३०० घड्याळांची चोरी करणाऱ्या सरूद्दीन ऊर्फ कालू ताजुद्दीन शेख (३२, रा. संजय नगर, मुंब्रा, ठाणे) या सराईत चोरट्याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी रविवारी दिली. त्याच्याकडून १६९ घड्याळे हस्तगत करण्यात आली आहेत.
कळव्यातील मनीषा
नगरातील रहिवासी रितेश आडिया (वय ४८) यांच्या घड्याळाच्या गोदामात विक्रीसाठी ३०० पेक्षा अधिक मनगटी घड्याळे त्यांनी ठेवली होती. या गोदामाच्या दरवाजाला लावलेले कुलूप कटावणीच्या साहाय्याने तोडून चोरट्यानी गोदामात शिरकाव करून सुमारे ३०० घड्याळांची चोरी केल्याचा प्रकार ३ जुलै २४ रोजी पहाटे १:३० वाजता घडला होता.
याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ),३३१ (३),३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शेख याने गोदामातून प्रत्येकी ३०० रुपये किमतीची ९० हजारांची ३०० घड्याळे चोरली होती. त्यापैकी ५० हजार ७०० रुपयांची १६९ घड्याळे हस्तगत केली आहेत.
चौकशीत दिली चोरीची कबुली
गुन्हा दाखल झाल्यानंतर कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सागर सांगवे आणि त्यांच्या पथकातील पोलिस हवालदार शहाजी एडके, रमेश पाटील, गणेश बांडे, श्रीमंत राठोड, राहुल पवार, अमोल ढावरे आणि अंमलदार प्रशांत लवटे आदींनी गोदाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून काही खबऱ्यांच्या मदतीने आरोपीला मुंब्य्रातील संजयनगर भागातून ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याविरोधात मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. सरुद्दीनविरुद्ध ठाणे आणि मुंबई शहरातील विविध पोलिस ठाण्यांत चोरी तसेच घरफोडीच्या विविध कलमांखाली १३ गुन्हे दाखल आहेत.