रिक्षात विसरलेले ५८ हजार रुपये परत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:47 AM2019-09-18T00:47:12+5:302019-09-18T00:47:19+5:30
रिक्षाचालकांची अरेरावी, भाडे नाकारणे, यासारख्या घटनांमुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत.
डोंबिवली : रिक्षाचालकांची अरेरावी, भाडे नाकारणे, यासारख्या घटनांमुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. मात्र, एका रिक्षाचालकाने रिक्षात विसरलेले ५८ हजार रुपये प्रवाशाला परत केले आहेत. त्यामुळे त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
पूर्वेतील आयरे गावात राहणारे रिक्षाचालक योगेश माने सोमवारी सकाळी आपली रिक्षा चालवत होते. यावेळी त्यांनी एका वयोवृद्ध महिलेला त्यांच्या रिक्षाने एका खाजगी रुग्णालयाजवळ सोडले. त्यानंतर माने नेहमीच्या रिक्षा स्टॅण्डवर प्रवाशांची वाट पहात उभे होते. त्यावेळी, रिक्षामध्ये एक पिशवी असल्याचे माने यांच्या निदर्शनास आली. माने यांनी पिशवी उघडल्यानंतर प्रतिभा पोतदार यांचे आधारकार्ड आणि ५८ हजार रुपये त्यात दिसले. माने यांनी आधारकार्डवरील पत्त्यावरून पोतदार यांचे घर गाठले. परंतु, त्यांच्या घराला कुलूप असल्याने माने यांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता त्या रुग्णालयात गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. शेजाºयांनी पोतदार यांच्या मुलाला फोन करून त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर माने यांनी रुग्णालयात जाऊन पोतदार यांना ही पिशवी परत केली. त्याबद्दल पोतदार यांनी त्यांचे आभार मानले.