ठाण्यात रेल्वेतून वर्षभरात ३००२ मोबाइल चोरीला , केवळ १० टक्के गुन्हे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:50 AM2018-01-18T00:50:22+5:302018-01-18T00:50:31+5:30
ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षभरात तब्बल ३,००२ मोबाइल फोन चोरीला गेले आहेत. ही आकडेवारी पाहता दररोज सरासरी ८ ते ९ मोबाइल फोन प्रवासादरम्यान चोरीला जात आहेत.
पंकज रोडेकर
ठाणे : ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षभरात तब्बल ३,००२ मोबाइल फोन चोरीला गेले आहेत. ही आकडेवारी पाहता दररोज सरासरी ८ ते ९ मोबाइल फोन प्रवासादरम्यान चोरीला जात आहेत. मोबाइल लांबवणारे मुख्यत्वे नशेखोर असून चोरलेल्या मोबाइलचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अवघे १० टक्के आहे. चोरीला जाणाºया मोबाइलची लोकेशन्स बहुतांश परराज्यात असल्याचे निदर्शनास आले आहे तर काही मोबाइलचे सुटे भाग विकले जात असल्याने गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे लोहमार्ग पोलिसांची हद्द कोपरी पुलापासून दिवा स्थानक ते दिव्यापासून निळजेपर्यंत आहे. ठाणे स्थानकातून दररोज ६ ते ७ लाख प्रवासी रेल्वेने ये-जा करतात. या गर्दीच्या लोकल प्रवासात मोबाईल फोन चोरीचे प्रकार वाढले आहेत. मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची यापूर्वी मिसींगमध्ये नोंद केली जात होती. जून २०१७ पासून चोरीला जाणाºया मोबाइलबाबत थेट एफआयआर नोंदवण्यास सुरूवात झाली. मागील वर्षात ठाणे रेल्वे प्रवासात तब्बल ३००२ मोबाइल चोरी गेले. या मोबाइल्सची किंमत ही ४ लाख ९५ हजार ३८६ इतकी आहे. तसेच त्यापैकी २८९ गुन्हे उघडकीस आले असून हे प्रमाण अवघे १० टक्के असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
परराज्यात मोबाइल : रेल्वे प्रवासात चोरीला गेलेले मोबाइल प्रामुख्याने पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक, उत्तर व मध्य प्रदेश, बिहार यासारख्या परराज्यात पाठवले जातात. काही मोबाइलचे सुटे भाग करून त्याची विक्री केली जात असल्याचे तपासात पुढे आले आहे.
चार्जिंग पॉईंटही झाले बंद
रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन येथे मोबाइल चार्जिंग पाईंट करण्यात आले होते. येथे मोबाइल चार्जिंगला लाऊन लोक जात होते. त्यातून काही मोबाईल चोरीला जाऊ लागले. याचा नाहक त्रास प्रशासनाला होऊ लागल्याने प्रशासनाने ते चार्जिंग पाईंटच बंद केले.
मागील २०१७ या वर्षात जवळपास ३ हजारांहून अधिक मोबाइल चोरीला गेले आहेत. मोबाइल चोरीचे प्रकार उघडकीस येण्याचे प्रमाण १० टक्के आहे. या वाढत्या घटना लक्षात घेऊन स्थानक परिसर आणि लोकलमध्ये पेट्रोलिंग वाढवले आहे. नशाबाजी करण्यासाठी चोरटे मोबाईल लांबवत असल्याचे तपासात उघड झाले आहे. - उत्तम सोनावणे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग ठाणे.