३०५ हॉटेलच्या एनओसी तयार असतांनाही एकानेही घेतली नाही ताब्यात, पुन्हा कारवाईची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 04:32 PM2018-03-08T16:32:08+5:302018-03-08T16:32:08+5:30
अग्निशमन विभागावर ठपका ठेवणाºया हॉटेलवाल्यांनी एनओसी तयार असतांना देखील अद्यापही ताब्यातच घेतल्या नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ३१ मार्च पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास या हॉटेलवाल्यांवर पुन्हा कारवाईची टांगती तलावर उभी राहिली आहे.
ठाणे - ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवार पासून शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी मंगळवार पासून बंद पुकारला होता. परंतु आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर हॉटेल व्याविसायिकांनी बंद मागे देखील घेतला आहे. आयुक्तांनी अॅडमेस्ट्रेटीव्ह टॅक्स कमी करण्याचे आश्वास दिल्यानंतर आणि सील केलेले हॉटेल तत्काळ खुले करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अग्निशमन विभागामार्फत अवघ्या काही तासातच शहरातील शिल्लक राहिलेल्या ३०५ हॉटेलच्या एनओसी तयार देखील झाल्या आहेत. परंतु त्या ताब्यात घेण्यासाठी अद्यापही एकाही हॉटेल चालकाने अग्निशमन विभागाशी संपर्क साधलेला नाही. विशेष म्हणजे या एनओसीला विलंब केल्यास शहर विकास विभागाकडून देखील या हॉटेल व्यावसायिकांना परवाने घेणे शिल्लक आहे. परंतु त्यांनी ३१ मार्च पर्यंत ही कार्यवाही पूर्ण केली नाही तर पुन्हा या हॉटेल व्यावसायिकांवर कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.
अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला नसलेल्या ठाणे शहरातील एकूण ४२६ हॉटेल्स, बार, लाऊंज यांना यापूर्वी अग्निशमन दलाच्यावतीने नोटीसी देण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास ८० आस्थापनांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्याने ती हॉटेल्स नियमित करण्यात आली आहेत. परंतु उर्वरीत हॉटेलवाल्यांनी याची पुर्तता न केल्याने ते सील करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर तीन दिवसात ३६ हॉटेल, बार सील करण्यात आले होते. परंतु, अग्निशमन दलाच्या जाचक अटीच्या विरोधात आणि पॅनल्टी चार्जेस कमी करण्याच्या उद्देशाने शहरातील सुमारे ५०० हॉटेल, बारवाल्यांनी मंगळवार पासून बंदची हाक दिली होती. या संदर्भात बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी हॉटेल, बार असोसिएशनच्या शिष्ठमंडळाशी चर्चा झाल्यानंतर या चार्जेसचे स्लॅब करुन ते २५ लाखांवरुन थेट पाच लाखापर्यंत खाली आणण्यात आले आहेत. तसेच सील केलेले हॉटेल तत्काळ खुले करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार अग्निशमन विभागाने आपली जबाबदारी पार देखील पाडली.
अग्निशमन विभागावर टिका करणाºया बार आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी याच विभागाने रात्री ११.३० वाजेपर्यंत शहरातील शिल्लक राहिलेल्या ३०५ हॉटेल, बारच्या एनओसी तयार केल्या आहेत. आता केवळ या हॉटेल व्यावसायिकांना कमी करण्यात आलेले चार्जेस भरुन या एनओसी ताब्यात घ्यावयाच्या आहेत. परंतु त्यानंतरही गुरुवारी दिवसभरात एकही हॉटेल व्यावसायिक अग्निशमन विभागाकडे फिरकलाच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या विभागावर टिका करणाºया आणि आंदोलन करणाºया हॉटेल व्यावसायिकांना आता एनओसीची गरज नाही का? असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
चौकट - शहर विकास विभागाचाही घ्यावा लागणार परवाना
अग्निशमन विभागाचे चार्जेस कमी करण्यात आले असले तरी शहर विकास विभागाचे कंपोडींग आणि चेंज आॅफ युजर्सचे चार्जेस मात्र कमी करण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे अग्निशमन विभागाची एनओसी घेतल्यानंतर या हॉटेल व्यावसायिकांना चेंज आॅफ युज करुन घेऊन त्याची माहिती शहर विकास विभागाला सादर करायची आहे. यासाठी आता केवळ २२ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. असे असतांना अद्याप अग्निशनम विभागाकडूनच एनओसी न घेतल्याने शहर विकास विभागाची एनओसी केव्हा मिळणार हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. ३१ मार्च पर्यंत जे हॉटेलवाले या प्रक्रिया पूर्ण करतील तेच १ एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहेत. परंतु जे या प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांच्यावर मात्र कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.