ठाणे जिल्हा लाेक अदालतीच्या कामात राज्यात सहाव्यांदा प्रथम, ३०५१० खटले निकाली
By सुरेश लोखंडे | Published: March 5, 2024 06:09 PM2024-03-05T18:09:36+5:302024-03-05T18:09:44+5:30
या लोकअदालतीमध्ये ५७ हजार ७१९ प्रलंबित प्रकरणे व एक लाख ६२ हजार ५२ दावा दाखल पूर्व प्रकरणे असे एकूण दाेन लाख १९ हजार ७७१ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.
ठाणे : जिल्हा व सत्र न्यायालयठाणे अंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालये व संलग्न न्यायालयांमध्ये ‘राष्ट्रीय लोकअदालत’ चे आयोजन करण्यात आले असता त्यात तब्बल ३० हजार ५१० प्रलंबित खटले तडजाेडीने निकाली काढण्यात आले. या कामात ठाणे जिल्ह्याचा यासह राज्यभरात सहाव्यांदा प्रथम क्रमांक आला आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार, तसेच ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रमुख श्रीनिवास ब्रि. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये हीराष्ट्रीय लाेक अदालत घेण्यात आली. त्यात ठाणे जिल्ह्याने सर्वाधिक खटले निकाली काढून राज्यभरात प्रथम क्रमां पटकवला आहे. आतापर्यंत ठाणे जिल्ह्याने सहाव्यांदा हा प्रथम क्रमांक मिळवून यश मिळवले आहे. या लोकअदालतीमध्ये सोशल मिडीया,व्हॉट्सअॅप कॉलचा वापर करुन अनेक प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड करण्यात आली. त्यामुळे पक्षकारांना प्रत्यक्ष न्यायालयात न येता लोकअदालतीमध्ये सहभागी होता आले.
या लोकअदालतीमध्ये ५७ हजार ७१९ प्रलंबित प्रकरणे व एक लाख ६२ हजार ५२ दावा दाखल पूर्व प्रकरणे असे एकूण दाेन लाख १९ हजार ७७१ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३० हजार ५१० प्रलंबित प्रकरणे व २१ हजार २२९ दावा दाखल पूर्व प्रकरणे असे एकूण ५१ हजार ७३९ प्रकरणे आपापसात तडजोडीने निकाली काढण्यात आली. एक अब्ज ७९ कोटी आठ लाख सहा हजार १०३ एवढया रकमेची तडजोड करण्यात आली.
या वर्षातील ही प्रथम राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालय व अनिधस्त तालुका न्यायालयांची मिळून एकूण १०४ पॅनल्सद्वारे लोकअदालतमध्ये एकूण ३० हजार ५१० प्रलंबित प्रकरणे व २१ हजार २२९ दावा दाखल पूर्व प्रकरणे, अशी एकूण ५१ हजार ७३९ प्रकरणे आपापसात तडजोडीने निकाली काढण्यात यश मिळाले.