३१ बिल्डरांच्या कामाच्या ठिकाणांची ‘झाडाझडती’; इतर बांधकाम व्यावसायिकांना १५ दिवसांची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 09:22 IST2025-01-08T09:21:42+5:302025-01-08T09:22:47+5:30
पाहणीत त्रुटी आढळल्या तर अशा बांधकाम व्यावसायिकांना दंड आकारला जाणार आहे

३१ बिल्डरांच्या कामाच्या ठिकाणांची ‘झाडाझडती’; इतर बांधकाम व्यावसायिकांना १५ दिवसांची मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेमार्फत उपाययोजना केल्याचा परिणाम काही अंशी दिसून आला आहे. ठाण्यातील हवेची गुणवत्ता सुधारली आहे; परंतु ३९ पैकी ज्या ३१ बांधकाम व्यावसायिकांनी नियमांची अंमलबजावणी केल्याचे दावे केले आहेत त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून झाडाझडती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला. उर्वरित बांधकाम व्यावसायिकांना १५ दिवसांची मुदत दिल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचे पालन करण्याबाबत २९७ बांधकामांना प्राथमिक नोटिसा पाठवण्यात आल्या. त्यापैकी, ३१ जणांनी सर्व नियमावलीचे पालन केल्याचा दावा पालिकेने केला. १५१ जणांकडे काही त्रुटी आढळल्याने त्यांना सुमारे चार लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आले. ३९ जणांनी नियमावलीची पूर्तता न केल्याने त्यांना बांधकाम का थांबवू नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
त्यासाठी त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली; परंतु त्यानंतरही अंमलबजावणी झाली नाही तर मात्र त्यांचे बांधकाम थांबविण्याचा इशारा पालिकेने दिला. या पाहणीत त्रुटी आढळल्या तर अशा बांधकाम व्यावसायिकांना दंड आकारला जाणार आहे.
हवा प्रदूषणात घट
मागील डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ठाण्यातील हवा प्रदूषणात वाढ झाली होती. त्यामुळे महापालिकेने यावर उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्याचा परिणाम आता काही प्रमाणात का होईना दिसून आला आहे. घोडबंदर भागातील हवा प्रदूषणाची पातळी ही सरासरी ११४ पर्यंत म्हणजेच मध्यम प्रदूषित गटात मोडली आहे, तर उपवन येथील हवा प्रदूषणाची पातळी १०२ च्या आसपास आहे.
मेट्रो आणि सेवा रस्त्यांच्या कामांमुळे त्रास
घोडबंदर भागात मागील कित्येक वर्षांपासून मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागात सायंकाळी सहानंतर वाहतूककोंडी होते. तसेच या भागात आता सेवा रस्त्यांची खोदाई सुरू आहे. त्यामुळे याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. नाकावर रुमाल बांधूनच सायंकाळच्या सुमारास येथील रहिवाशांना प्रवास करावा लागतो. तसेच या भागातच मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांची कामे सुरू आहेत. त्यामुळे येथील धूळ आणि हवा प्रदूषणात फारशी घट झाल्याचे चित्र दिसत नाही.