३१ दिवसांत रुग्णसंख्या ६0४!, रुग्णसंख्या ६१५, आतापर्यंत १९ रुग्ण दगावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 02:05 AM2020-04-27T02:05:59+5:302020-04-27T02:06:09+5:30
२४ मार्च ते २५ एप्रिल या अवघ्या ३१ दिवसांत तब्बल ६0४ रुग्ण आढळले. या काळातच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
पंकज रोडेकर
ठाणे : जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठाणे महापालिका क्षेत्रात आढळल्यानंतर शनिवार, २५ एप्रिलपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ६१५ झाली आहे. २४ मार्च ते २५ एप्रिल या अवघ्या ३१ दिवसांत तब्बल ६0४ रुग्ण आढळले. या काळातच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
२ एप्रिल रोजी एकाच दिवशी जिल्ह्यात २४ रुग्ण सापडले होते. या कालावधीत सहा दिवस असे आहेत, की त्यादिवशी तब्बल ४0 ते ४६ रुग्ण सापडले आहेत. उल्हासनगर येथे सापडलेल्या पहिल्या रुग्णानंतर दुसरा रुग्ण आढळून येण्यासाठी एक महिन्याहून अधिक कालावधी लागला. दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात पहिला रुग्ण सापडल्यावर एक महिन्यानंतर भिवंडीत पहिला रुग्ण मिळाला.
ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रांसह दोन नगरपालिका व ग्रामीण भागात आतापर्यंत १२ हजार १६६ संशयित रुग्ण मिळाले. त्यापैकी सात हजार ९९४ जणांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले होते. या क्वारंटाइन केलेल्या नागरिकांमध्ये एक हजार २१0 संशयितांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मुंबईतील कस्तुरबा आणि जे.जे. रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांतही पाठवण्यात आले होते. त्यापैकी ६१५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यापैकी आतापर्यंत १९ रुग्ण दगावले असले तरी, १२८ जणांनी या कोरोनावर मात करून ते घरी परतले आहेत.
जिल्ह्यात पहिला रुग्ण १३ मार्च रोजी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सापडला होता. त्यानंतर १२ दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण ठामपामध्ये सापडला नव्हता. तेराव्या दिवसांपासून दहापेक्षा कमी रुग्ण दररोज सापडायला सुरुवात झाली. मात्र १३ एप्रिलला एकाच दिवशी २३ रुग्ण वाढले. तेव्हापासून रुग्णांची संख्या शून्यावर येऊ शकली नाही. रुग्णांचा आलेख वाढत ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत २५ एप्रिलपर्यंत २0९ रुग्ण मिळाले.
कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिकांच्या हद्दीत पहिला रुग्ण १४ मार्च रोजी मिळाला. केडीएमसीने १८ एप्रिल रोजी, तर नवी मुंबईने २ एप्रिल रोजी रुग्णांचा दुहेरी आकडा गाठला. या दोन्ही महापालिकांनी रुग्णांचे शतक एकापाठोपाठ पूर्ण केले आहे. मीरा-भार्इंदर येथे पहिला रुग्ण २९ मार्च रोजी मिळाला. या महानगरपालिकेने १३ एप्रिल रोजी रुग्णांचा दुहेरी आकडा गाठला. अल्प कालावधीत या पालिकेने पॉझिटिव्ह रुग्णांचे शतक गाठले. अंबरनाथ आणि बदलापूर येथे ४ एप्रिल रोजी एकाच दिवशी प्रत्येकी एकेक रुग्ण आढळला होता. सद्य:स्थितीत अंबरनाथ येथे एकूण चार तर बदलापूरमध्ये रुग्णांची संख्या १६ वर पोहोचली आहे.
ठाणे ग्रामीणमध्ये २५ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडल्यानंतर आतापर्यंत १७ रुग्ण सापडले आहे. उल्हासनगर येथे पहिला रुग्ण १९ मार्च रोजी सापडला असला तरी, दुसरा रुग्ण तब्बल एक महिन्यानंतर म्हणजे २३ एप्रिल रोजी आढळून आला. सुरुवातीच्या महिनाभरात एकही रुग्ण न सापडणाऱ्या भिवंडीत १२ एप्रिल रोजी पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर अवघ्या १३ दिवसांत येथील एकूण रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली आहे.
>जिल्ह्यात १३ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून २५ एप्रिलपर्यंत सहा दिवस असे आहेत की, त्यादिवशी जिल्ह्यात
एकही रुग्ण सापडलेला नाही.
उर्वरित दिवसांमध्ये एक किंवा दोन रुग्ण मिळालेले पाच
दिवस आहेत. एका दिवशी तीन, तर दोन दिवशी चार आणि
पाच रुग्ण मिळाले.
६, ७,८ आणि ९ रुग्ण मिळालेले प्रत्येकी एकेक दिवस आहेत. दोन दिवस आहेत, ज्यावेळी प्रत्येकी १२ आणि १३ रुग्ण
मिळाले होते.
एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण मिळण्याचे प्रमाण ४0 ते ४६ आहे. एवढे रुग्ण मिळणारे गेल्या ३१ दिवसांत असे सहा दिवस असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.