पहिल्यांदाच दिव्यांग व्यक्तींना ३१६ स्टॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 12:25 AM2018-12-04T00:25:23+5:302018-12-04T00:25:32+5:30
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक वर्षे प्रलंबित असणारा दिव्यांग व्यक्तींचा स्टॉलचा प्रश्न महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल तात्काळ निकाली काढत आहे.
ठाणे : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक वर्षे प्रलंबित असणारा दिव्यांग व्यक्तींचा स्टॉलचा प्रश्न महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल तात्काळ निकाली काढत आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ३१६ स्टॉलचे दिव्यांग व्यक्तींना सोमवारी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत स्टॉलचे वाटप करण्यात आले.
ठाणे महापालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी स्टॉलचे वाटप करण्यात यावे ही मागणी अनेक वर्षे आ. बच्चूभाऊ कडू तसेच ठाण्यातील विविध सामाजिक संस्था करत आहेत. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त जयस्वाल यांच्याकडे वेळोवेळी मागण्यांचे निवेदन दिले होते. या बाबत सर्व पदाधिकाºयांची तात्काळ बैठक घेवून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्टॉलचे वाटप करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले होते. यावेळी उप महापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, महिला व बालकल्याण समिती सभापती राधिका फाटक, क्रीडा समाजकल्याण व सांकृतिक कार्य समिती सभापती दिपक वेतकर, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उप आयुक्त संदीप माळवी तसेच समाज विकास अधिकारी शंकर पाटोळे आदी उपस्थित होते.
यावेळी महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाºया विविध योजनांचे लाभपत्रही यावेळी दिव्यागांना करण्यात आले.
या निमित्ताने गडकरी रंगायतन येथे किरण नाकती प्रस्तुत दिव्यांग मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्र माचे तसेच धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा या विशेष शाळेतील आणि ठाणे महानगरपालिका हद्दीतील विविध विशेष शाळांमधील दिव्यांग मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
योजना राबविणारी देशातील पहिली महापालिका - एकनाथ शिंदे
दिव्यांगासाठी अशा प्रकारे विविध योजना राबविणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका असल्याचे उदगार यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. या दिव्यांगांना सहानभुती नको पण संधी द्या असेही यावेळी शिंदे यांनी सांगितले. तसेच ठाणे महापालिका राबवित असलेल्या विविध योजनांचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.
गडकरी रंगायतनच्या हिरवळीवर हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे जागा कमी असल्याने येथे दिव्यांगांसह इतरांची चांगलीच गर्दी झाली होती. त्यामुळे आलेल्यांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक दिव्यागांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. अनेक दिव्यांगांना तर उभ्यानेच हा कार्यक्रम पहावा लागला.
दिव्यागांना झाले सापाचे दर्शन... पळापळ
आधीच गडकरीच्या हिरवळीवरील कमी जागेत दिव्यांगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामुळे दिव्यांगांची गर्दी झाली होती. त्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु होताच, स्टेजच्या समोर अचानक एक छोट्या सापाने आपले दर्शन दिले. त्यामुळे आरडा ओरड सुरु झाला आणि काहीशी पळापळही झाली. परंतु काही मिनिटांतच हा गोंधळ शांत झाला. तेवढ्यात सापाने आपला मार्ग बदलून तेथून पळ काढला.
>ठामपाकडून नेत्यालाच दिव्यांगांचा स्टॉल, लोकायुक्तांकडे तक्रार
ठाणे : ठाणे महानगरपालिकेने दिव्यांगांच्या रोजीरोटीसाठी अनेक योजनांना मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाने ठामपा हद्दीतील एक हजार बेरोजगार दिव्यांगांना व्यवसायासाठी जागा देण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार ६५० बेरोजगार दिव्यांग व्यक्तींकडून स्वयंघोषणा व प्रतिज्ञापत्र भरून अर्ज घेतले होते. मात्र, यात ठामपाच्याच एका कर्मचाºयासह दिव्यांगांचा तथाकथित नेता असलेल्या एका लाभार्थ्यालाच स्टॉलसाठी जागा दिल्याचा प्रकार बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना व हमराही एज्युकेशन अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) चे युसुफ खान यांनी उघडकीस आणला आहे. यासंदर्भात त्यांनी लोकायुक्तांकडे तक्र ार केली आहे. महापालिका हद्दीत राहणाºया दिव्यांगांच्या तथाकथित नेत्यांनी राजकीय पाठबळाचा वापर करून ठामपाकडून दिव्यांगांचे स्टॉल हडप केले आहेत. ज्यांच्या नावे मुंबईमध्ये स्टॉल मंजूर आहेत किंवा पालिकेच्या सेवेत कार्यरत आहेत; अशा लोकांना नव्याने स्टॉल देण्यात येऊ नयेत, असे निर्देश असतानाही धर्मवीर दिव्यांगसेनेचे अध्यक्ष शरद पवार यांना ठाणे महानगरपालिकेने स्टॉलसाठी जागा दिली आहे. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी खान यांनी तक्रार केली. त्यांची चौकशी सुरू असतानाच राजकीय दबावापोटी हा स्टॉल मंजूर केल्याचा आरोप खान यांनी केला आहे. ठामपामध्ये सफाई कामगारालासुद्धा हे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकाराची ठामपा आयुक्तांसह लोकायुक्तांकडे तक्रार केल्याची माहितीत्यांनी दिली. यासंदर्भात शरद पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यापूर्वी मी मुंबईत वास्तव्यास होतो, तेव्हा मला स्टॉल मिळाला होता. परंतु, पाच वर्षांपासून मी ठाण्यात रहात असल्याचे सांगितले. त्यामुळे मनपाकडे पत्रव्यवहार करून मला रितसर स्टॉल दिला आहे. अद्यापही तो ताब्यात आलेला नाही. त्यानंतर मुंबईतील स्टॉल रद्द करण्यासाठी मनपाला पत्र देणार आहे.