अंबरनाथमध्ये ३२ झाडे कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:42 AM2021-05-18T04:42:02+5:302021-05-18T04:42:02+5:30
अंबरनाथ: रविवारी रात्रीपासून सोमवारी दिवसभर जोरदार वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथमध्ये १९ ठिकाणी ३२ झाडे कोसळली. अग्निशमन दलाने रात्री ...
अंबरनाथ: रविवारी रात्रीपासून सोमवारी दिवसभर जोरदार वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथमध्ये १९ ठिकाणी ३२ झाडे कोसळली. अग्निशमन दलाने रात्री साडेअकरा वाजल्यापासून दोन वेगवेगळ्या टीम तयार करून शहराच्या पूर्व-पश्चिम भागात पडलेली ही झाडे रस्त्यातून बाजूला केली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.
रविवारी रात्री अंबरनाथमध्ये वारे व पावसाला सुरुवात झाली. सोमवारी सायंकाळपर्यंत ठिकठिकाणी झाडे कोसळली. पूर्व व पश्चिम भागात मिळून ३२ झाडे पडली.
भीमनगर, कानसई, खेर सेक्शन, शिवाजी नगर, वडवली सेक्शन, नाना-नानी पार्क, बी केबिन रोड, समर्थ चौक, हुतात्मा चौक, कमलाकर नगर, कैलास नगर, मुस्लीम कब्रस्तान, हिंदू स्मशानभूमी, अंबरनाथ पोलीस स्टेशन, छाया रुग्णालय, भाजी मार्केट, लक्ष्मी नगर, शिवगंगा नगर आदी ठिकाणी झाडे कोसळली. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडाले. मात्र यामध्ये कुणालाही दुखापत झाली नसल्याचे अंबरनाथ नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी सांगितले. वीजपुरवठा करणारे खांब पडल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
..........
अग्निशमन दल ऑनड्यूटी
अंबरनाथ नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर सोनोने यांच्यासह लिडिंग फायरमन डी.बोरसे, रमेश गवळी, जे गायकर, भंडारी, फरड, दाजी पाटील, अशोक धोंडे,किशोर भोर, आरिफ पटेल,जालिंदर बन आदींनी रविवारी मध्यरात्रीपासून शहराच्या भंगाभागात रस्त्यावर, घरांवर पडलेली झाडे, झाडांच्या फांद्या बाजूला करण्याचे काम सुरू केले. सोमवारी रात्रीपर्यंत हे काम सुरू होते. शहराच्या पूर्व-पश्चिम भागात झाडे हटविण्यासाठी दोन वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या.
...........
सहा वाहनांचे नुकसान
अंबरनाथच्या समर्थ चौकात झाड पडल्याने एका मोटार, एका मोटरसायकल व एका रिक्षाचे नुकसान झाले.
तर नाना-नानी पार्कमध्येही एक मोटार व दोन मोटरसायकलचे नुकसान झाले. यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही.
---
वाचली