पालघरचे ३२१ शिक्षक अखेर ठाणे जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 06:27 AM2018-05-09T06:27:57+5:302018-05-09T06:27:57+5:30
चार वर्षांपासून पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३२१ शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे. तर ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली आहे.
ठाणे - चार वर्षांपासून पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३२१ शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे. तर ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली आहे.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर १ आॅगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी मे मध्ये झालेल्या शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये ५५० हून अधिक शिक्षक पालघरमध्ये फेकले गेले. पालघरची स्थापना झाल्यानंतर शिक्षकांना बदलीसाठी जिल्हा बदलीचा नियम लागला. त्यामुळे या शिक्षकांचा पुन्हा ठाणे जिल्ह्यात परतण्याचा मार्ग बंद झाला. बहुसंख्य शिक्षकांची कुटुंबे व मुले शिक्षणासाठी ठाण्यात व नोकरी पालघरमध्ये अशी स्थिती निर्माण झाली. काही शिक्षकांना घरापासून शाळेपर्यंत पोचण्यासाठी सहा ते सात तासांचा अवधी लागत होता.
त्यामुळे या शिक्षकांच्या पुन्हा ठाणे जिल्ह्यात बदलीसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार हे तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शिक्षण समितीचे सभापती म्हणून त्यांनी नव्याने प्रयत्न सुरू केले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंत्रालयात बैठका घेण्यात आल्या. तसेच ठाणे व पालघर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. राज्य सरकारने पालघरमधून ठाण्यात ३२१ शिक्षकांच्या बदल्या केल्याची माहिती जि.प.चे उपाध्यक्ष पवार यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघर जिल्ह्यात बदली झाली. मात्र, ठाण्यात जागा रिक्त झाल्यानंतर साधारण दीड वर्षांत शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात घेतले जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली.
पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, उपाध्यक्ष सुभाष पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचे आभार मानण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक सोमवारी ठाण्यात आले होते. एका अनौपचारिक कार्यक्रमात शिक्षकांनी पदाधिकाºयांचे आभार मानले. विकल्प समितीचे शंकर भोईर यांनी पदाधिकाºयांचा सत्कार केला. तसेच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, शिक्षणाधिकारी मीना यादव यांचेही शिक्षकांनी आभार मानले.
ठाण्यात जागा रिक्त झाल्यानंतर बदली
च्अखेर सुभाष पवार यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, राज्य सरकारने पालघरमधून ठाण्यात ३२१ शिक्षकांच्या बदल्या केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली.
च्ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघर जिल्ह्यात बदली झाली. मात्र, ठाणे जिल्ह्यात जागा रिक्त झाल्यानंतर साधारण दीड वर्षांत शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात घेतले जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली.