ठामपाच्या तिजोरीत ३२२.२५ कोटी जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 03:22 AM2020-11-28T03:22:11+5:302020-11-28T03:22:26+5:30
मालमत्ताकराचा भरणा : मुंब्रा येथून झाली सर्वात कमी करवसुली
ठाणे : कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली होती. यामुळे या काळातील मालमत्ताकर माफ करावा, अशी मागणीही झाली होती. असे असतानाही महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ताकरापोटी ३२२.२५ कोटी जमा झाले आहेत. कोरोनाकाळातही ठाणेकरांनी महापालिकेच्या हाकेला साथ देऊन मालमत्ताकर भरला आहे. महापालिकेने शहरातील संपूर्ण पाच लाख दोन हजार करदात्यांना देयके अदा केली होती. त्यातील दोन लाख २६ हजार करदात्यांनी आपला कर भरला आहे. तर, मागील वर्षी याच कालावधीत ३५० कोटींची वसुली झाली होती.
कोरोनामुळे महापालिकेचा आर्थिक गाडाही रुळावरून खाली आला होता. मालमत्ताकर तसेच इतर करांचीही वसुली थांबली होती. त्यामुळे विकासकामांवरदेखील परिणाम झाल्याचे दिसले. तिजोरीत पैसा नसल्याने ठेकेदारांची बिलेही थांबली. त्यानंतर, पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात झाल्यानंतर ठेकेदारांनादेखील बिले अदा करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पाणीपट्टीची वसुली मागील महिन्यात चांगली झाली. ठामपाने मोबाइल व्हॅन, ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. याशिवाय, १५ सप्टेंबरपर्यंत कर जमा केल्यास मालमत्ताकराच्या सामान्यकरात १० टक्के सवलत दिली. ती ३० सप्टेंबरपर्यंत वाढविली होती. विशेष म्हणजे वसुली करताना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती व कारवाई केलेली नाही. त्यामुळेच ठाणेकरांनी महापालिकेच्या तिजोरीत कराचा भरणा केल्याचे दिसून आले.
माजिवड्यात जास्त भरणा
कर भरण्यामध्ये ठाण्यातील माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती सर्वात पुढे असून येथील करदात्यांनी आतापर्यंत १०७.०७ कोटींचा भरणा केला आहे. त्यातुलनेत सर्वात कमी ८.१८ कोटींचा करभरणा मुंब्रा प्रभाग समितीमधून झाला आहे.
समितीनिहाय वसुली
प्रभाग समिती वसुली रक्कम
उथळसर २८.२७
नौपाडा-कोपरी ५४.७८
कळवा १५.३९
मुंब्रा ०८.१८
दिवा १३.४६
वागळे इस्टेट १४.०३
लोकमान्य सावरकर १६.११
वर्तकनगर ५७.७९
माजिवडा-मानपाडा १०७.०७
इतर (मुख्यालय) ०७.१७
एकूण ३२२.२५
(वसुली रक्कम कोटींत)