महासभेला ३२४६.३२ कोटींचा अर्थसंकल्प सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:38 AM2021-03-24T04:38:13+5:302021-03-24T04:38:13+5:30
ठाणे : कोरोनामुळे महापालिकेने कोणत्याही नव्या प्रकल्पांची घोषणा न करता काटकसरीचा दोन हजार ७५५ कोटी ३२ लाखांचा अर्थसंकल्प सादर ...
ठाणे : कोरोनामुळे महापालिकेने कोणत्याही नव्या प्रकल्पांची घोषणा न करता काटकसरीचा दोन हजार ७५५ कोटी ३२ लाखांचा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु, यात स्थायी समितीने तब्बल ४९१ कोटींची वाढ सुचवून तीन हजार २४६ कोटी ३२ लाखांचा अर्थसंकल्प मंगळवारी सभापती संजय भोईर यांनी महासभेला सादर केला.
यामध्ये मालमत्ता करात १०० कोटी, जाहिरात फी १७.६३ कोटी, सार्वजनिक बांधकाम १० कोटी, शहरविकास विभाग ३१३ कोटी, तर पाणीपुरवठा आकारात २५ व इतर सहा कोटी ३७ लाख अशी एकूण ४९१ कोटींची वाढ प्रस्तावित केली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ५ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला २०२०-२१चे दोन हजार ८०७ कोटींचे सुधारित तर २०२१-२२ चे दोन हजार ७५५ कोटी ३२ लाखांचा मूळ अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावर स्थायी समितीने १५ दिवस चर्चा करून त्याला मंजुरी दिली होती. सर्व विभागांशी चर्चा केल्यानंतर २०२०-२१ च्या सुधारित अर्थसंकल्पात ११० कोटी ९३ लाखांची वाढ केल्याने सुधारित अर्थसंकल्प दोन हजार ९१७ कोटी ९६ लाखांवर गेला असून मूळ अर्थसंकल्पात ४९१ कोटींची वाढ सुचविल्याने तो तीन हजार २४६ कोटी ३२ लाखांवर गेला आहे.
कोरोनामुळे पालिकेचे उत्पन्न घटल्याने मूळ अर्थसंकल्पात प्रशासनाने एक हजार ३०० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. जे प्रकल्प सुरू आहेत त्यांना ब्रेक लागण्याची चिन्हे निर्माण झाली होती. याशिवाय नगरसेवकांनादेखील प्रभागात कामे करणे कठीण झाले होते. यासाठी मूळ अर्थसंकल्पात ४९१ कोटींची वाढ केली असल्याची माहिती भोईर यांनी दिली.