पालिकेला सर्वेक्षणात आढळली ३२५ पडीक वाहनं ; परिवहन विभागा कडे नोंदणी रद्द करण्यासाठी पाठवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 09:54 PM2018-06-18T21:54:49+5:302018-06-18T21:54:49+5:30
मीरा भाईंदर महापालिकेने रस्ते तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी बेवारस वा पडीक अवस्थेत असलेल्या वाहनांचे सर्वेक्षण करण्यासह नोटीसा बजावण्यास सुरवात केल्या नंतर आज सोमवार पर्यंत ३२५ वाहनं आढळून आली
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने रस्ते तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी बेवारस वा पडीक अवस्थेत असलेल्या वाहनांचे सर्वेक्षण करण्यासह नोटीसा बजावण्यास सुरवात केल्या नंतर आज सोमवार पर्यंत ३२५ वाहनं आढळून आली आहेत . या वाहनांवर ४८ तासात वाहन उचलण्याच्या नोटिसा लावण्यात आल्या आहे . सर्वेक्षण अजून सुरु असल्याने वाहनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे . मालकाने वाहन सोडवून नेले नाही तर त्याची नोंदणी रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागा कडे यादी पाठवली जाणार आहे. आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिलेल्या आदेशा नंतर शहरातील पडीक - बेवारस वाहनां विरूद्ध कारवाई गेल्या आठवड्या पासून सुरु झाली आहे . रस्ते , पदपथ , उद्याने , मैदाने व अन्य सार्वजनिक ठिकाणी पडून असलेल्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले आहे . या मुळे आपली नादुरुस्त वा भंगार वाहने ठेवण्यासाठी पालिका रस्ता आदी सार्वजनिक जागांचा वापर करणाऱ्यां मध्ये धावपळ सुरु झाली आहे .
सर्वेक्षण करण्यासाठी कनिष्ठ अभियंता , स्वच्छता निरीक्षक यांच्या सोबतच कर विभागाच्या निरीक्षकांना देखील सहभागी केले आहे. सर्वेक्षणात पडीक वाहन दिसताच जागीच प्रभाग अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीची नोटीस देखील चिटकवली जात आहे . दुचाकी, रिक्षा , टेम्पो , कार , ट्रक आदी प्रकारच्या वाहनांचा यात समावेश आहे. दोन दिवसाचा अवधी नोटिशीत वाहन काढून घेण्यासाठी दिला आहे . वाहन न उचलल्यास महापालिका ते उचलून नेईल . ते सोडवण्यासाठी आवश्यक दंड व शुल्क नाही भरले तर 8 दिवसांनी प्रादेशिक परीवहन विभागास पत्र देऊन वाहनाचे नोंदणी रद्द करण्याची विनंती केली जाईल . नोंदणी रद्द झाल्यावर वाहन भंगारात लिलावात काढले जाईल असे अतिक्रमण विभाग प्रमुख संजय दोंदे म्हणाले . प्रभाग समिती ६ च्या हद्दीत सर्वात जास्त १५० पडीक वाहनं आढळली आहेत . तर प्रभाग समिती १ मध्ये ५०; प्रभाग समिती २ मध्ये १३; प्रभाग समिती ३ मध्ये ४८ ; प्रभाग समिती ४ मध्ये ४० तर प्रभाग समिती ५ मध्ये २४ पडीक वाहनं सोमवार पर्यंत केलेल्या सर्वेक्षणात आढळली असल्याचे दोंदे म्हणाले .