ठाणे जिल्ह्यात सापडले नवे ३३ रुग्ण, ठाणे शहराची संख्या २०० पार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 02:26 AM2020-04-26T02:26:54+5:302020-04-26T02:27:11+5:30
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ११ रुग्ण सापडल्याने येथील एकूण रुग्णांच्या संख्येने द्विशतक पूर्ण केले आहे.
ठाणे : जिल्ह्यात शनिवारीही नवीन कोरोना पॉझिटिव्ह ३३ रुग्ण आढळले. यामध्ये ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ११ रुग्ण सापडल्याने येथील एकूण रुग्णांच्या संख्येने द्विशतक पूर्ण केले आहे. तर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६१५ इतकी झाली आहे. ठामपा क्षेत्रामध्ये शनिवारी दोघांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या १९वर पोहोचली आहे. या मृतांमध्ये एक ८० वर्षीय पुरुष आणि ४८ वर्षीय महिलेचा समावेश असून ते विविध आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शुक्रवारी जिल्ह्यात ३७ रुग्ण आढळले होते. तर शनिवारी सापडलेल्या ठाण्यातील ११ रु ग्णांमध्ये ७ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. या रुग्णांमुळे येथील एकूण रुग्णांची संख्या २०७ झाली आहे. केडीएमसीमध्ये मिळालेल्या तीन रुग्णांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पुरुष रुग्णांमध्ये एक मुंबईतील पोलीस आहे. येथील एकूण रुग्णसंख्या ११७ झाली आहे. नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर येथे शनिवारी प्रत्येकी ९ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील एकूण रुग्ण ११२, मीरा-भार्इंदरमधील एकूण संख्या १२९ झाली आहे. त्याचबरोबर ठाणे ग्रामीणमध्ये एक नवीन रुग्ण आढळल्याने येथील संख्या १७ झाली. भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथे एकही रुग्ण शनिवारी आढळून आलेला नाही.
>अंबरनाथ ‘कोरोना रुग्ण’मुक्त शहर
अंबरनाथ : शहरात कोरोनाचे ४ रुग्ण आढळले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला. तर इतर ३ रुग्णांवर उपचार सुरू होते. या तिघांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तिघांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून त्यांना होम क्वारंटाइन केले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी देविदास पवार आणि कोरोनासाठी नेमलेले डॉ. मेजर नितीन राठोड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. शहराच्या सुरक्षेसाठी आणखी उपाययोजना आखत असल्याचे त्यांनी नमूद केले.