ठाण्यात 33 हजार 492 किलो निकृष्ट खाद्यतेल जप्त; कंपनीवर एफडीएची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 01:43 AM2020-11-14T01:43:58+5:302020-11-14T06:55:26+5:30
उत्पादन थांबविण्याचे दिले आदेश
n लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचे उत्पादन करणाऱ्या ठाणे तालुक्यातील पिंपरी येथील कंपनीवर ठाणे अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये २६ लाख ८५ हजारांचे विविध प्रकारचे ३३ हजार ४९२ किलो ग्रॅम खाद्यतेल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) यशवंत दौंडे तसेच राहुल तकटे, गौेतम जगताप आणि व्यंकट चौहाण या अधिकाऱ्यांनी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी एनएम एंटरप्रायझेस या पिंपरी येथील कंपनीवर धाड टाकून कारवाई केली. या कंपनीत भेसळयुक्त तसेच निकृष्ट दर्जाच्या तेलाची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे या पथकाने ही कारवाई केली. या कंपनीमध्ये सकस, चांगल्या दर्जाचे आणि सुरक्षित खाद्यतेलाची निर्मिती होते का, याच्या तपासणीसाठी कंपनीची सुसज्ज प्रयोगशाळा नव्हती. त्याचबरोबर उत्पादन प्रक्रियेवर निरीक्षणासाठी तज्ज्ञ व्यक्ती नव्हती.
खाद्यतेल ज्या मानांकनामध्ये निर्मिती होणे अपेक्षित आहे, तसा त्याचा दर्जा नव्हता, ते पॅकिंग करण्यासाठीही योग्य खबरदारी घेतलेली नव्हती. अशा अनेक त्रुटींमुळे गाळा क्रमांक ९५२ मधील या तेल उत्पादनाच्या कारखान्यातील २१ लाख ४१ हजार ५९२ रुपयांचे २९ हजार ९९६ किलो ग्रॅम रिफाइन सोयाबीन तेल, एक लाख ४३ हजार ८०८ रुपयांचे एक हजार ४९८ किलो ग्रॅम वजनाचे पामोलिन तेल आणि तीन लाख ९९ हजार ६०० रुपयांचे एक हजार ९९८ किलो ग्रॅम वजनाचे खोबरेल तेल याठिकाणी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.