कळव्यामध्ये स्लॅब कोसळून ३३ वर्षीय तरूणीचा मृत्यू; दुसऱ्या महिलेच्या उजव्या हाताला दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 10:19 AM2023-11-03T10:19:15+5:302023-11-03T10:20:11+5:30
धाेकादायक इमारतीतील स्लॅब काेसळल्याने घरातील साहित्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कळवा-विटावा सूर्यानगर परिसरात तळ अधिक एक मजली इमारतीचा स्लॅब गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास कोसळला. या घटनेत चंद्रिका जनार्दन (३३) हिचा मृत्यू झाला, तर लीलावती शहाजान कुंजू (६५) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. धाेकादायक इमारतीतील स्लॅब काेसळल्याने घरातील साहित्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले.
विटावा येथे २३ वर्षे जुने बांधकाम असलेल्या तळ अधिक एक मजली इमारतीमधील नवनाथ गोळे यांच्या मालकीच्या घराच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले. त्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून इमारत धोकादायक स्थितीत आहे.
घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, बीट निरीक्षक व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी (कळवा प्रभाग समिती) व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. या घटनेत चंद्रिका यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली होती. जखमी अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी चंद्रिकला मृत घोषित केले. ही इमारत तत्काळ रिकामी करण्यासाठी महापालिकेने संबंधितांना नोटीस बजावली आहे. या रहिवाशांची इतर ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.