ठाणे पालिकेवर आली ३३०० कोटी दायित्वाची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 01:13 AM2020-03-12T01:13:22+5:302020-03-12T01:15:16+5:30
दिवा येथील खाडी व पादचारी पुलाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. देसाई खाडीवरील पुलाचे काम मे २०२० पासून सुरू करण्यात येणार आहे.
ठाणे : विकासाचे ठाणे अशी ओळख असलेल्या ठाणे महापालिकेवर पाच वर्षांत हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांमुळे तब्बल ३३०० कोटींचे दायित्व आले आहे. महापालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी सादर केलेल्या २०२०-२१ च्या मूळ अंदाजपत्रकाच्या वेळी ही कबुली दिली आहे. त्यामुळेच यापुढे महसुली खर्चावर निर्बंध आणताना, जमा होणाऱ्या उत्पन्नातून भांडवली खर्च कसा केला जाऊ शकतो, यावर भर देण्यात आला आहे.
पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प हा ठाणेकरांसाठी निराशाजनकच आहे. ४९.३० लाखांच्या शिलकीसह २०१९-२० चा ३११० कोटींचा सुधारित आणि २०२०-२१ चा ३७८० कोटींचे मूळ अंदाजपत्रक प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी स्थायी समितीला सादर केले. विशेष म्हणजे मागील वर्षी ३८६१.८८ कोटींचे मूळ अंदाजपत्रक होते. ते यंदा तब्बल ८१.८८ कोटींनी कमी झाले आहे. याचे कारणही आता पुढे आले आहे. मागील काही वर्षांत पालिकेने घेतलेल्या नवनवीन प्रकल्पांमुळे ३३०० कोटींचे दायित्व आले आहे. त्यामुळे नवीन प्रकल्प सादर न करता, महसुली खर्चावर नियंत्रण आणि भांडवली खर्चासाठी निधी उपलब्ध व्हावा, असा पालिकेचा प्रयत्न असणार आहे. परंतु, हे करीत असताना महापालिकेने खाडीचे खारे पाणी गोड करण्याचा, आयुक्त संजीव जयस्वाल यांचा हॅप्पीनेस इंडेक्सचा प्रकल्प, धरण, ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी आदींसह महत्त्वाच्या प्रकल्पांना यंदाच्या अंदाजपत्रकात तिलांजली देण्यात आली आहे.
मागील काही वर्षांत पालिकेने विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले होते. यामध्ये स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांवरच अधिक खर्च होणार होता. यामध्ये नवीन ठाणे स्टेशन, पारसिक चौपाटी, जलवाहतूक, अंतर्गत मेट्रो आदींसह इतर महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले. यापोटीच पालिकेला भिकेचे डोहाळे लागणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. आता तशी कबुली पालिकेनेच दिली आहे. त्यामुळेच नवीन प्रकल्पांची घोषणा न करता जुनेच प्रकल्प पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
स्मशानभूमींचा विकास व आधुनिकीकरण
जवाहरबाग स्मशानभूमीचे काम सुरू असून, पहिल्या टप्प्याचे काम संपून दुसºया टप्प्याचे काम सुरू आहे. भार्इंदरपाडा येथील संयुक्त स्मशानभूमी व स्मृतीउद्यानाचा विकास करताना आरक्षणाखालील जमिनीपैकी २३ हजार १०० चौ.मी. क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात आले असून, सुमारे १२ हजार ८०० चौ.मी. क्षेत्र संपादनाच्या अंतिम टप्प्यात आहे.
शैक्षणिक सुविधा :
खारीगाव येथील कावेरी हाईटस येथील प्राथमिक व माध्यमिक शाळा आरक्षणाच्या जागेवर समावेशक आरक्षणामधून ३०५० चौ.मी. क्षेत्राची तीन कोटी खर्चाची शाळा इमारत विनामूल्य प्राप्त होणार आहे. पूर्वद्रुतगती महामार्गालगत असलेल्या चिरागनगर परिसरात म्युनिसिपल हौसिंगच्या नऊ कोटी किमतीच्या एकूण २०० सदनिका पार्किंग व्यवस्थेसह समावेशक आरक्षणाच्या विकासामधून ठाणे महापालिकेस प्राप्त होणार आहेत. पूर्वद्रुतगती महामार्गालगत गोल्डन डाईज जंक्शनजवळ असलेल्या अग्निशमन केंद्र आरक्षणाचे विकसन त्यावर तिसरा व चौथा मजला मत्स्यालय वापरासाठी जागा विकसित केली जाणार आहे.
रस्ते विकास : रस्ते विकास योजनेंतर्गत ३५०.५६ कि.मी. लांबीच्या एकूण ८६७ रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. २०१५-१६ पर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये एकूण ३५६.४० कि.मी. लांबीचे रस्ते होते. त्यापैकी सिमेंट काँक्र ीट / यूटीडब्ल्यूटी पद्धतीने तयार केलेल्या रस्त्यांची लांबी १०८.२५ कि.मी. असून, उर्वरित डांबरीकरण पद्धतीने तयार केलेल्या रस्त्यांची लांबी २४८.१५ कि.मी. आहे, तर उर्वरित रस्त्यांचा विकास यंदा केला जाणार आहे. महापालिका क्षेत्रातील १२ मुख्य चौकांचे मास्टिक पद्धतीने पुन:पुष्टीकरण करण्याचे काम सुरू असून, त्यातील पाच चौकांचे काम शिल्लक आहे. यानुसार यंदाच्या अंदाजपत्रकात रस्ते नूतनीकरण/ रु ंदीकरण अंतर्गत ८० कोटी, सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी ६० कोटी, विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी १२५ कोटी, यूटीडब्ल्यूटी रस्त्यांसाठी रु .१६५ कोटी, मिसिंग लिंकसाठी ८० कोटी तरतूद प्रस्तावित केली आहे. कळवा खाडीपुलाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
खाडी व पादचारी पूल : दिवा येथील खाडी व पादचारी पुलाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. देसाई खाडीवरील पुलाचे काम मे २०२० पासून सुरू करण्यात येणार आहे. पादचारी पुलांतर्गत नव्याने सिंघानिया हायस्कूल, वर्तकनगर, घोडबंदर रस्त्यावर कारमेळ शाळा व पंचामृत सोसायटीसमोर, बाळकुमनाका, पारसिक रेतीबंदर अशा एकूण सहा ठिकाणी पादचारी पुलांची कामे हाती घेण्यात आली असून, या सर्व पादचारी पुलांची कामे मे २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून यासाठी ८८.५० कोटी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
मेट्रोऐवजी लाइट रेल ट्रान्झिट
ठाण्यातील अंतर्गत मेट्रोच्या जागी आता एलआरटी धावणार आहे. त्यानुसार या संदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून, तो अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. यासाठी अंदाजपत्रकात २५ कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.
मुंब्रा येथे बांधणार सुसज्ज हज हाउस
मुंब्रा येथे हज हाउसच्या बांधकामाचे आराखडे नकाशे व डीपीआर तयार करण्यासाठी वास्तुविशारदांची नेमणूक करण्यात येत आहे. ते बांधण्यासाठी येणाºया खर्चास व निधी उपलब्ध करण्याबाबत हज कमिटी आॅफ इंडिया (केंद्र शासन वैधानिक संस्था यांच्याकडून अंतिम मंजुरी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही ठाणे महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी तीन कोटी तरतूद प्रस्तावित केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात अलीकडेच याची घोषणा झाली.
ठाणे खाडीलगत कोस्टल रोड विकसित : ठाणे शहरांमधून जाणारी अवजड वाहतूक शहरांबाहेरून जाण्यासाठी साकेतपासून बाळकुमनाका ते गायमुखपर्यंत खाडीकिनाºयालगत १५ कि.मी. लांबीच्या कोस्टल रोडचे बांधकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित आहे. या कामाचे सर्वेक्षण करणे, पर्यावरण विषयक मान्यता मिळविणे आणि जागेबाबत वेगवेगळ्या परवानग्या संदर्भात दस्तावेज तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती व अनुषंगिक कामे यासाठी दहा कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.
इतर कामे : कौसा हॉस्पिटलसाठी नऊ कोटी अग्निशमन केंद्राची पुनर्बांधणी व नवीन अग्निशमन केंद्र बांधण्यासाठी व बीट फायर स्टेशन ११ कोटी, तीनहात नाक्यावरील ग्रेड सेपरेटरसाठी तीन कोटी, अंतर्गत जलवाहतुकीचे काम मेरीटाइम बोर्डाकडून केले जाणार असले, तरी त्यासाठी इतर काही कामे करण्याच्या दृष्टीने त्याचाही समावेश यात करण्यात आला आहे.
एकात्मिक तलाव सौंदर्यीकरणासाठी ३७ पैकी १८ तलावांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरित तलावांच्या विकासासाठी पाच कोटी आणि तलाव पुनरु ज्जीवन व शुद्धीकरणांतर्गत १४ कोटी प्रस्तावित आहेत. इमारती बांधणे - यामध्ये प्रामुख्याने साकेत येथील मनोरंजन केंद्र, पडले येथील नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, तुळशीधाम-धर्मवीर नगर येथील इमारत इत्यादीचा समावेश आहे.
या कामांसाठी दहा कोटी, दवाखाना बांधण्यासाठी दहा कोटी, शाळा बांधकामासाठी आठ कोटी, सार्वजनिक शौचालयांच्या विकासासाठी नऊ कोटी, स्मशानभूमी बांधणे व कब्रस्तान विकासासाठी १२ कोटी, पाणीपुरवठा सक्षमीकरणांतर्गत बारवी धरणातून वाढीव पाणीसाठा उचलण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पाणीपुरवठा व्यवस्था व रिमॉडेलिंगअंतर्गत घोडबंदर आणि मुंब्य्रात कामे सुरू असून ११ कोटी प्रस्तावित आहेत. नालेबांधणीसाठी ६० कोटी, भुयारी गटार योजना टप्पा क्र . ४ साठी ७५ कोटी व टप्पा क्र . ५ साठी ३० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.