मेट्रोच्या मार्गात येणारे ३३३ पथदिवे हटविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:18 AM2020-09-29T00:18:56+5:302020-09-29T00:19:27+5:30
चार कोटी सहा लाख ३८ हजारांचा खर्च : ठामपाच्या स्थायी समितीने दिली मान्यता
ठाणे : वडाळा ते कासारवडवली मेट्रो प्रकल्पाच्या ठाण्यातील कामात ३३३ पथदिवे बाधित होणार आहेत. ते नऊ मीटर उंचीचे असून आता त्याऐवजी महापालिका येथे इतर ठिकाणी चार कोटी सहा लाख ३८ हजार ७८६ रुपये खर्चून सात मीटर उंचीचे ६०९ पथदिवे उभारणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या बैठकीत स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यातही या ठिकाणी असलेल्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीमुळे पथदिव्यांची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मेट्रोच्या मार्गातील आणखी एक अडथळा दूर झाला आहे.
ठाण्यात सध्या तीनहातनाका ते कासारवडवली या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. कोरोनामुळे त्याची गती मंदावली होती. परंतु, आता पुन्हा त्याला सुरुवात झाली आहे. मेट्रो प्रकल्पाची मार्गिका ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्ग आणि मुंबई-अहमदाबाद महामार्ग याठिकाणाहून जाणार आहे. त्यासाठी या दोन्ही महामार्गांवर मेट्रोचे खांबउभारणीचे काम सुरू असून त्यावर आता गर्डर बसविण्यात येणार आहेत. यापूर्वी यात अडसर ठरणारे वृक्ष तोडले आहेत. त्यापाठोपाठ आता बाधित होणारे पथदिवेदेखील हटविण्याचा निर्णय घेऊन यासंबंधीच्या कामाची अंतिम निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. त्यामध्ये जुने पथदिवे हटवून त्याजागी नवीन पथदिवे बसविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या मेट्रो मार्गाजवळील २२ केव्ही उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीमुळे नऊ मीटर उंचीचे खांब सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उभे करणे शक्य नसल्यामुळे सात मीटर उंचीचे चार पथदिवे लावून पुरेसा प्रकाश पडतो का, याची खात्री केली. त्यानुसार, ते बसविण्याचा निर्णय घेतला. यामुळे पथदिव्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे प्रस्तावात नमूद आहे.
एक पथदिवा ६६ हजार ७३० रुपयांना
तीनहातनाका ते कासारवडवली याठिकाणी हे ३३३ पथदिवे असून त्याठिकाणी आता एकूण ६०९ पथदिवे बसविण्यात येणार आहेत. तीन टप्प्यांत ही कामे विभागली होती. त्यानुसार, तीनहातनाका ते कापूरबावडी जंक्शन या पहिल्या टप्प्यातील कामासाठी एक कोटी १२ लाख ५७ हजार, कापूरबावडी ते कासारवडवली या दुसºया टप्प्यातील कामासाठी दोन कोटी ८७ लाख २२ हजार आणि कॅडबरी जंक्शन ते तीनहातनाका येथील हायमास्ट स्थलांतरित करण्यासाठी सहा लाख ५९ हजार ७८६ रुपयांच्या लघुत्तम निविदांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे.