‘टेलिमानस’मध्ये उदासीनतेच्या ३३,६१० तक्रारी; ८ ते ४५ वर्षे वयोगटांतील व्यक्तींच्या सर्वाधिक समस्या
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 22, 2024 11:18 AM2024-09-22T11:18:33+5:302024-09-22T11:19:04+5:30
मानसिक त्रासाची जवळपास १७ कारणे सांगितली जात आहेत.
ठाणे : मानसिक आजाराविषयी २४*७ ऑडिओद्वारे समुपदेशन करणाऱ्या टेलिमानसमध्ये दोन वर्षांत ३३,६१० व्यक्तींनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. यात मनाची उदासीनता किंवा मूड खराब असणे या समस्या सर्वाधिक सांगितल्या जात आहेत. १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील व्यक्ती सर्वाधिक समस्या सांगत असल्याचे निरीक्षण ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने नोंदविले आहे. मानसिक त्रासाची जवळपास १७ कारणे सांगितली जात आहेत.
नैराश्य, चिंता, सतत होणारा मानसिक त्रास व्यक्तींनी बोलून दाखवावा, त्रास मनात साठवून न ठेवता त्यांनी व्यक्त व्हावे, या उद्देशाने केंद्र सरकारने टेलिमानसची स्थापना केली. यात महाराष्ट्रात प्रथमच ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात टेलिमानस सुरू झाले आहे. या दोन वर्षांत ३३,६१० व्यक्तींनी आपल्या समस्या मांडल्याचे निदर्शनास आले. मनाची उदासीनता, प्रेमभंग, परीक्षेची चिंता, बेरोजगारी, पगार कमी असणे, ताणतणाव यांसारख्या अनेक मानसिक त्रासाची कारणे या व्यक्तींकडून सांगण्यात आली आहेत. दिवसाला अंदाजे ४५ कॉल्स टेलिमानसवर येतात. विशेषत: शहरी भागांतून सर्वाधिक कॉल्स येतात.
समस्या
मनाची उदासीनता
ताणतणाव
झोप न येणे
चिंता
झोप कमी होणे
आक्रमक होणे
कौटुंबिक वाद
नात्यात समस्या असणे
व्यसन असणे
आरोग्य विषयक समस्या
परीक्षा किंवा अभ्यासाची चिंता
वयोगट कॉलची टक्केवारी जाणवणाऱ्या समस्या
१८ ते ४५ वर्षे ७२.७ टक्के विवाह किंवा इतर नात्यात समस्या,
नोकरीत मानसिक त्रास जाणवणे.
४६ ते ६४ वर्षे १६ टक्के रात्री झोप येत नाही किंवा निवृत्तीनंतर
चिंता सतावणे
१३ ते १७ वर्षे ५.२ टक्के परीक्षेची चिंता सतावणे
६५ वर्षांवरील ४.८ टक्के झोपेचा त्रास
० ते १२ वर्षे १.२ टक्के अस्थिर असलेल्या बालकाशी कसे
वागावे, मुले अभ्यास करत नाही.
मानसिक विकलांग मुलांशी कसे वागावे?
देशभरातील कोणत्याही व्यक्तीला मानसिक त्रास जाणवत असेल, त्यांनी १४४१६ या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा. टेलिमानससाठी एका शिफ्टला ४ ते ८ समुपदेशक असतात. ते समोरच्या व्यक्तीची समस्या जाणून त्याप्रमाणे त्याचे समुपदेशन करतात. आम्ही यात त्या व्यक्तीची गोपनीयता ठेवतो. कोणालाही मानसिक आजाराची सौम्य किंवा मध्यम लक्षणे जाणवत असतील किंवा मानसिक त्रास असेल ते या टोल फ्री क्रमांकावर कधीही फोन करू शकतात.
- डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधिक्षक, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय